पुणे : राज्यभरातील विविध कारागृहांमध्ये बंदिस्त असलेल्या तसेच कारागृह उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने पगार वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कुशल बंदी, अर्धकुशल बंदी, अकुशल बंदी, खुल्या वसाहतीतील बंद्यांना ही पगारवाढ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे कारागृह विभाग पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी दिली.
राज्यातील विविध कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या व्यावसायिक कौशल्याचे शिक्षण दिले जाते. यासाठी कारागृहांमध्ये विविध उद्योग सुरू करण्यात आलेले आहेत. या कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणारे कैदी हे बऱ्याच दिवसांपासून ज्याप्रमाणे विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ठरावीक कालावधीनंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होत असते त्याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती, ती मागणी अखेर मान्य झाली आहे.कैदी कारागृहातील उद्योगांमध्ये काम करून आर्थिक मोबदला कमावतात व त्यातून स्वतःसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृह उपहारगृहातून खरेदी करतात. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मनिऑर्डर करतात. काही बंदी मिळालेल्या आर्थिक मोबदल्यातून वकिलांची फी भरतात. अशा अनेक कामांसाठी बंद्यांना स्वतः खर्च करता येतो. राज्यातील सर्व ६० कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी सात हजार कैदी काम करत आहेत. यामध्ये ६ हजार ३०० पुरुष कैदी तर ३०० महिला कैदी आहेत.
अशा प्रकारे मिळणार लाभ..
बंद्यांची वर्गवारी सध्याचे दर सुधारित दर (प्रति दिवस)कुशल बंदी ६७ ७४ अर्धकुशल बंदी ६१ ६७ अकुशल बंदी ४८ ५३ खुल्या वसाहतीतील बंदी ८५ ९४