इंदापूरला देशपातळीवर ‘थ्रीस्टार’ मानांकन; स्वच्छ सर्वेक्षणात सलग चौैथ्यांदा कोरले नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 14:13 IST2021-11-21T13:55:42+5:302021-11-21T14:13:13+5:30
इंदापूरला देशपातळीवर कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे

इंदापूरला देशपातळीवर ‘थ्रीस्टार’ मानांकन; स्वच्छ सर्वेक्षणात सलग चौैथ्यांदा कोरले नाव
बारामती : देशपातळीवर इंदापूर नगरपरिषदेने सलग चौथ्यांदा स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानामध्ये आपले नाव कोरले आहे. इंदापूरला देशपातळीवर कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते नगरसेवक भरत शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, जावेद शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छतेसंदर्भात विशेष उपक्रम राबवत देशपातळीवर चौथ्यांदा नावलौकिक मिळविला आहे. शनिवार (दि.२०) नवी दिल्ली विज्ञान भवनमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा उपस्थित होते.
दरम्यान, सलग चौथ्यांदा कचरामुक्त शहर म्हणून मानांकन मिळाल्याने राज्यातील इतर नगरपरिषदांसमोर इंदापूर नगरपरिषदेने आदर्श निर्माण केला आहे. नगरपरिषदेच्या वतीने ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्ट खत प्रकल्प उभारला होता. या माध्यमातून ओला, सुका, प्लॅस्टीक, सॅनिटरी असे विलगीकरूण करून कंपोस्ट खतामध्ये रूपांतर केले. तसेच सुका, जैव वैद्यकीय व ई कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेने पाऊले उचचली. परिणामी शहरातील कचराची समस्या आटोक्यात आली. तसेच वसुंधरा अभियानांतर्गत शहरात झालेली वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्क निर्मिती, स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी भित्तीचित्रे, पथनाट्य, वेगवगेळ्या स्पर्धा, लघूपट, चित्र प्रदर्शन आदींमुळे इंदापुरकरांचा देखील या अभियानामध्ये सहभाग वाढला. सलग चौथ्यांदा देशपातळीवर हा पुरस्कार मिळवून देण्याची किमया नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या कार्यकाळात घडली आहे. याबाबत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील नरगपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी तसेच नगरसेवकांचे कौैतुक केले आहे.
''हा पुरस्कार इंदापूर शहरातील प्रत्येक नागरिकाचा आहे. स्वच्छतेतून समृद्धीचा मार्ग मिळतो. आपले शहर स्वच्छ असावे यासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. यानंतर देशपातळीवर इंदापूर नगरपरिषद क्रमांक एकवर येण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असे इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सांगितले.''