देशात गर्भाशय काढण्याचं प्रमाण वाढलं; 'या' राज्यात तर भयानक स्वरूप उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:54 IST2025-01-08T17:54:11+5:302025-01-08T17:54:47+5:30
-१०० पैकी दर ५ महिलांमध्ये काढण्यात येत आहे गर्भाशय

देशात गर्भाशय काढण्याचं प्रमाण वाढलं; 'या' राज्यात तर भयानक स्वरूप उघड
- अंबादास गवंडी
पुणे : मासिक पाळीदरम्यान होणारा रस्तस्त्राव, आर्थिक समस्या आणि साक्षरतेचा अभाव यामुळे गेल्या १० वर्षांत गर्भाशय काढण्याचे प्रमाण वाढत आहे. संशोधनानुसार १०० पैकी दर ५ महिलांचे गर्भाशय काढण्यात येत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. यासंबंधित नुकतेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार ही गंभीर बाब समोर आली आहे. देशात सगळ्यात जास्त गर्भाशय काढण्याचे प्रमाण आंध्र प्रदेशात असून, त्याखालोखाल तेलगंणा राज्यात आहे.
गौरव गुन्नाल आणि सुदष्णा राय या लोकसंख्याशास्त्र आणि आरोग्य अभ्यासकांनी याबाबत संशोधन करण्यात आले. यामध्ये कशामुळे काढले जाते, याचे धक्कादायक गोष्टी समोर आले आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील (मजुरी) करणाऱ्या महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव, शिवाय पैशांच्या आमिषाचे गर्भाशय काढले जात आहे. तसेच मासिक पाळीत होणाऱ्या त्रासामुळे ५५.४ टक्के, फायब्राइड्स गाठीमुळे १९.६ आणि गर्भाशयाचे विकारामुळे १३.९ टक्के महिला गर्भाशय काढत आहेत, असा निष्कर्ष नोंदविण्यात आले आहे. तसेच लवकर होणारे बाळंतपण, लठ्ठपणा याचा परिणाम यावर होत आहे. दरम्यान, सरकारी दवाखान्यापेक्षा खासगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गर्भाशय काढण्यात येत आहे.
असा आहेत निष्कर्ष
-देशात २५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये सर्वात जास्त गर्भाशय काढण्यात येत आहे.
-शेतीक्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये याचे प्रमाण ३२ टक्के असून, इतर महिलांच्या तुलनेत यांचे प्रमाण जास्त आहे.
-देशात सगळ्यात जास्त गर्भाशय काढण्याचे प्रमाण आंध्र प्रदेश (१२.६ टक्के), त्यानंतर तेलंगणा (११.१ टक्के), बिहार (८.६ टक्के), गुजरात (६.२ टक्के) आहेत.
-सुशिक्षित महिलांपेक्षा शेती करणाऱ्या महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
खासगीमध्ये प्रमाण जास्त
गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियामध्ये जवळपास ६७.५ टक्के खासगी केंद्रामध्ये केले जात आहे. यातुलनेत सरकारी दवाखान्यात याचे प्रमाण कमी असून, ३२.२ टक्के इतके आहे. यामध्ये ४० ते ४९ वयोगटातील महिलांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे संशोधनातून दिसून आले. विशेषत: मासिक पाळीत होणारा त्रास, आर्थिक समस्या यामुळे गर्भाशय काढले जात आहे. देशात आंध्र प्रदेशात याची भयानक स्वरूप आहे. -गौरव गुन्नाल, संशोधक