थंडीत पायाची नस आखडणे, पोटरीत गोळे येण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; समस्या दूर करण्यासाठी 'ही' काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:33 IST2025-12-18T10:33:16+5:302025-12-18T10:33:28+5:30
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा त्रास केवळ थंडीमुळे होणारा तात्पुरता त्रास नसून तो शरीरातील खनिजे, पाणी किंवा नसांशी संबंधित आजाराचा इशारा असू शकतो

थंडीत पायाची नस आखडणे, पोटरीत गोळे येण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; समस्या दूर करण्यासाठी 'ही' काळजी घ्या
पुणे : हिवाळ्याचा कडाका वाढत असताना शहरासह ग्रामीण भागात पायात अचानक नस आखडणे, पिंडरीत गोळे येणे, तसेच पायाची बोटं एकमेकांवर चढणे अशा तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः रात्री झोपेत किंवा सकाळी उठताना हा त्रास अधिक जाणवत असून, अनेक नागरिकांना तीव्र वेदनांमुळे झोपेतून जाग येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा त्रास केवळ थंडीमुळे होणारा तात्पुरता त्रास नसून तो शरीरातील खनिजे, पाणी किंवा नसांशी संबंधित आजाराचा इशारा असू शकतो. हिवाळ्यात तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी पायांच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे स्नायू ताठर होऊन अचानक आकडी (क्रॅम्प) येते. यालाच सर्वसाधारण भाषेत ‘नस धरली’ किंवा ‘गोळा आला’ असे म्हटले जाते. काही रुग्णांमध्ये हा गोळा काही सेकंदांत कमी होतो, तर काहींमध्ये वेदना दीर्घकाळ टिकतात.
मुख्य कारणे
हिवाळ्यात पाणी कमी पिण्याची सवय, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम या खनिजांची कमतरता. दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसून काम करणे. अचानक व्यायाम किंवा शारीरिक श्रम. मधुमेह, थायरॉइड, नसांचे विकार, थंड व घट्ट पादत्राणांचा वापर. ही प्रमुख कारणे आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मधुमेही रुग्ण, गर्भवती महिला आणि दिवसभर उभे राहून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक आढळतो.
बोटावर बोटं चढणे म्हणजे काय?
काही रुग्णांमध्ये पायाची बोटं अचानक वाकडी होऊन एकमेकांवर चढल्यासारखी दिसतात. तज्ज्ञांच्या मते, हे लक्षण नसांवरील ताण किंवा खनिजांच्या तीव्र कमतरतेचे संकेत असू शकते. हा त्रास वारंवार होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. या आजारामुळे पायाच्या पोटरीमध्ये तीव्र वेदना, पायाची हालचाल न होणे, रात्री झोपेचा खोळंबा, चालताना अडचण, कामात एकाग्रता न राहणे. अशा समस्या उद्भवतात. काही रुग्णांमध्ये हा त्रास दीर्घकाळ सुरू राहिल्यास दैनंदिन जीवन विस्कळीत होते.
घ्यावयाची काळजी
दिवसातून दोन वेळा पायांचे हलके स्ट्रेचिंग व्यायाम, पायांना कोमट पाण्याची शेक किंवा गरम पाण्यात पाय बुडवणे. दिवसाला किमान २ ते २.५ लिटर पाणी पिणे, आहारात केळी, नारळपाणी, दूध, दही, हिरव्या भाज्या, सुके मेवे यांचा समावेश, झोपण्यापूर्वी गरम तेलाने मालिश, थंडीत पाय उबदार ठेवणारे मोजे व योग्य पादत्राणांचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो. रात्री पाय शेकणे सुद्धा उपयोगी होऊ शकते.
डॉक्टरांकडे कधी जावे
पायात वारंवार गोळे येत असल्यास, पायात सुन्नपणा, मुंग्या, जळजळ जाणवत असल्यास, बोटं कायम वाकडी होत असल्यास, मधुमेह किंवा थायरॉईड असणाऱ्या रुग्णांमध्ये अचानक त्रास वाढल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज भासल्यास रक्तातील खनिज तपासणी, जीवनसत्त्वांची चाचणी किंवा नसांची तपासणी करण्यात येते.
हिवाळ्यात नस आखडणे व गोळे येणे हा आजार टाळता येण्यासारखा आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि थंडीपासून पायांचे संरक्षण केल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो. नागरिकांनी या लक्षणांकडे गांभीर्याने पाहून वेळीच काळजी घ्यावी. - डॉ. श्रीनिवास शिंत्रे, विभाग प्रमुख, अस्थिव्यंगोपचार विभाग, ससून.