income Tax : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही कर आकारणी;येत्या अंदाजपत्रकात मांडण्यात येणार प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:17 IST2025-02-06T13:13:03+5:302025-02-06T13:17:00+5:30

महापालिकेला उत्पन्नात वाढ करायची झाल्यास अशा व्यावसायिक गाळ्यांना कराची आकारणी करण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विचार सुरू

Income Tax: Taxation in Pune on the lines of Mumbai; Proposal to be presented in the upcoming budget | income Tax : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही कर आकारणी;येत्या अंदाजपत्रकात मांडण्यात येणार प्रस्ताव

income Tax : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही कर आकारणी;येत्या अंदाजपत्रकात मांडण्यात येणार प्रस्ताव

- हिरा सरवदे

पुणे :
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातील झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळ्यांना मिळकतकराची आकारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या अंदाजपत्रकात मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते. सध्या झोपडपट्ट्यांमधील घरांसाठी महापालिका गलिच्छ वस्ती निर्मूलन (गवनी) कर आकारते. हा कर नाममात्र असतो. मात्र, या झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने, सोन्याची दुकाने, गिरणी, किराणा माल, बेकरी, भाजीपाल्याची दुकाने, भंगार आदींची दुकाने आहेत. या दुकानांना व्यावसायिक कर लावला जात नाही.

महापालिकेला उत्पन्नात वाढ करायची झाल्यास अशा व्यावसायिक गाळ्यांना कराची आकारणी करण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विचार सुरू आहे. मुंबई महापालिकेचे अंदाजपत्रकात झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळ्यांना कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेनेसुद्धा अशा प्रकारे निर्णय घेतल्यास महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 

शहरात झोपडपट्ट्यांमध्ये व्यावसायिक गाळ्यांचा वापर मोठ्याप्रमाणात आहे. महापालिका अशा गाळ्यांना कर लावण्याचा विचार करत आहे. या गाळ्यांना कराची आकारणी झाल्यास महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होईल. त्यामुळे महापालिका आयुक्त यांच्यासमोर यासंदर्भात निवेदन ठेवण्यात येईल. याला मान्यता मिळाल्यास आगामी अंदाजपत्रकात याचा समावेश करण्याचा विचार आहे.  - माधव जगताप, उपायुक्त, मिळकत कर आकारणी व कर संकलन विभाग 

Web Title: Income Tax: Taxation in Pune on the lines of Mumbai; Proposal to be presented in the upcoming budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.