भटक्या विमुक्त समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये घालणे, हा मोठा अन्याय - लक्ष्मण माने
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:48 IST2025-08-28T17:48:23+5:302025-08-28T17:48:32+5:30
भटका विमुक्त समाज हा बलुतेदार नाही किंवा गाव गाड्यातला नसून हा समाज गावकुसाबाहेर लांब रानावनात राहणारा आहे.

भटक्या विमुक्त समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये घालणे, हा मोठा अन्याय - लक्ष्मण माने
पुणे: भटक्या विमुक्त समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये घालणे, हा या समाजावर झालेला मोठा अन्याय आहे. हा अन्याय दूर करून पूर्वीसारखे भटके विमुक्त अ आणि ब या ४२ जमातींचा स्वतंत्र संवर्ग पूर्वी केला होता. तसाच तो करावा व बहुजन कल्याण खात्यातून आम्हाला बाजूला करून आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५.५० टक्के बजेट हे या समाजाला देण्यात यावे, अशी मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष आणि उपराकार लक्ष्मण माने यांनी केली आहे.
भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे गरूनाथ गायकवाड, कलावती भाटी, संगीता शिवकर, जयश्री मोहिते, रमेश भोसले आदी उपस्थित होते. भटका विमुक्त समाज हा बलुतेदार नाही किंवा गाव गाड्यातला नाही. हा समाज गावकुसाबाहेर लांब रानावनात राहणारा आहे. मुळचे हे सगळे आदिवासी आहेत. १८७१ च्या गुन्हेगार जमाती कायद्याने यांना कलंकित केले होते. त्यामुळे ओबीसींच्या यादीमध्ये भटक्या विमुक्त समाजाला घालणे, हा या समाजावर झालेला मोठा अन्याय आहे. गेली ५० वर्षे आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत. परंतु, या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नव्हते. शासनाने आता सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली.