१०० दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी उपाययोजनांचा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:49 IST2025-01-31T14:46:56+5:302025-01-31T14:49:02+5:30
रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करुन महानगरपालिकेने ते अतिक्रमण तात्काळ काढावेत

१०० दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी उपाययोजनांचा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासंबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्यावात. १०० दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूककोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित वाहतूक समस्येबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता वाहतूककोंडी कमी करण्याकरिता पुढाकार घ्यावा. रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करुन महानगरपालिकेने ते अतिक्रमण तात्काळ काढावेत. रस्ते आणि वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती द्यावी. याकरिता आवश्यकतेप्रमाणे पोलीस विभागाची मदत घ्यावी. याकरिता अत्याधुनिक साधने, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) नवनवीन तंत्रज्ञानाची तसेच या विषयाशी निगडित तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. भूसंपादनाची प्रलंबित असलेली न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी.
सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करा
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता पुणे महापालिकेकडे असलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करावी. नवले पुलाचे प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत. स्मार्ट सिटी कार्यालयातील वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पोलीस आयुक्ताकडे वर्ग करावी. अहिल्यानगर व सोलापूर महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रव्हॅल्स थांब्याकरिता जागा निश्चित कराव्यात. सुरक्षितेतच्यादृष्टीने त्याठिकाणी सीसीटीव्ही, वीज आणि शौचालय, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी.
पायाभूत सुविधा उभाराव्यात
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मिळून कार्यवाही करावी. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उभाराव्यात. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.