पुण्यात एका बाजूला दिवाळीचा जल्लोष अन् दुसरीकडे बारमध्ये जुगाराचा डाव; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 23:20 IST2025-10-20T23:19:12+5:302025-10-20T23:20:27+5:30
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून त्यात लोक पैसे लावताना आणि जुगार खेळताना दिसत आहेत.

पुण्यात एका बाजूला दिवाळीचा जल्लोष अन् दुसरीकडे बारमध्ये जुगाराचा डाव; व्हिडिओ व्हायरल
पुणे - पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित बारमध्ये दिवाळी पार्टीच्या आड पोकरचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बारमध्ये अनेक तरुण आणि उच्चभ्रू समाजातील व्यक्ती सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी पार्टीच्या नावाखाली बारमध्ये खास बंदोबस्त ठेवून “पोकर” नावाचा कार्ड गेम सुरू करण्यात आला होता. या ठिकाणी मोठ्या रकमेचे व्यवहार होत असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून त्यात लोक पैसे लावताना आणि जुगार खेळताना दिसत आहेत.
कोरेगाव पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर बार आणि लाउंज असल्याने या ठिकाणी अशा प्रकारच्या बेकायदेशीर जुगाराच्या पार्ट्या होत असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून, संबंधित बारला परवानगी कोणी दिली आणि जुगार खेळण्यास कसे मोकळे सोडले याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पोकर या खेळाला महाराष्ट्रात कायदेशीर मान्यता नाही. कायद्यानुसार पोकर हा “कौशल्याचा खेळ” की “जुगार” यावर नेहमीच वाद असतो, परंतु महाराष्ट्रातील विद्यमान “बॉम्बे प्रिव्हेंशन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट”नुसार कोणत्याही प्रकारचा पैशांवर आधारित कार्ड गेम हा जुगार म्हणूनच गणला जातो. त्यामुळे या प्रकरणात बार व्यवस्थापनावर तसेच आयोजकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे."