श्रीवल्लीची काढली छेड; पुष्पावर गुन्हा दाखल, तरुणीला भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:36 IST2022-03-28T15:35:29+5:302022-03-28T15:36:02+5:30
पुण्यात एका टोळभैरवाने तरुणीला भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला

श्रीवल्लीची काढली छेड; पुष्पावर गुन्हा दाखल, तरुणीला भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न...
पुणे : पुष्पा चित्रपटातील नायिका श्रीवल्लीसारखी दिसतेय, असे म्हणून एका टोळभैरवाने तरुणीला भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी सोहेल व त्याच्या साथीदार आरबाज या दोघा टोळभैरवांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील लहुजी समाज मंदिराजवळ शनिवारी रात्री ९ वाजता घडला.
याप्रकरणी धनकवडीतील एका २० वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सध्या पुष्पा या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. सोहेल व आरबाज हे दोघे फिर्यादीच्या घरासमोर येथून शिट्ट्या मारत असत. त्यावर फिर्यादी हिने त्यांना शिट्ट्या का वाजवतो, असे विचारले. तेव्हा सोहेल याने तु पुष्पामधील हिरोईनसारखी दिसतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तिचा हात धरुन तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तिचा विनयभंग केला. हे पाहून तिचा भाऊ फिर्यादीला सोडविण्यासाठी आला असताना आरबाज याने त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे दोघांनी आरडाओरडा केल्यामुळे आरोपी तेथून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.