पुण्यात विवाहित तरुणाची मुठा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:25 IST2022-12-17T13:24:09+5:302022-12-17T13:25:36+5:30
एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल...

पुण्यात विवाहित तरुणाची मुठा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या
पुणे : कल्याणीनगर भागात मुठा नदीपात्रात उडी घेत विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका तरुणीविरोधात येरवडा पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला.
हरिश प्रेमकिशन पवार (वय २४, रा.लष्कर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिशच्या आईने याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हरिश विवाहित आहे. हरिश यांची गतवर्षी आरोपी तरुणीसाेबत ओळख झाली होती. ताे विवाहित असल्याची माहिती तरुणीला होती, तरीही तिने त्याच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. हरिश आणि त्याच्या पत्नीत दुरावा यावा, म्हणून तिने त्याच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तसेच हरिश काम करीत असलेल्या खासगी कंपनीत जाऊन तरुणी त्याला त्रास देऊ लागली. मी सांगेन त्याप्रमाणे वागायचे, असे सांगून तिने धमकावले होते. तरुणीच्या त्रासामुळे हरिशने कल्याणीनगर येथील पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली, असे हरिशच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करीत आहेत.