दहिहंडीच्या गर्दीत हरवलेला १३ वर्षीय मुलगा पोलिसांच्या तत्परतेने १ तासातच सुखरूप सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 21:19 IST2025-08-22T21:19:01+5:302025-08-22T21:19:49+5:30
शिवाजीनगर पोलिस स्टेशन व कॉप २४ मार्शल्सच्या तत्परतेमुळे दहीहंडीच्या गर्दीत हरवलेले बालक सुखरूप पालकांकडे

दहिहंडीच्या गर्दीत हरवलेला १३ वर्षीय मुलगा पोलिसांच्या तत्परतेने १ तासातच सुखरूप सापडला
पुणे - दहीहंडीच्या उत्सवात पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. या गर्दीत हरवलेल्या १३ वर्षीय मुलाला पोलिसांनी व ‘कॉप २४ मार्शल्स’च्या संयुक्त मदतीने सुखरूप शोधून काढले. हरवलेल्या मुलाचे पालक काळजीने हतबल झाले होते. परंतु पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे मुलाला सुरक्षितरित्या पालकांकडे सोपवण्यात आले.
घटना कशी घडली?
१६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी १३ वर्षीय मुलगा दहीहंडी पाहण्यासाठी आईसह घरातून बाहेर पडला होता. मात्र रात्री दहीहंडी फुटल्यानंतर रात्री १०:१५ वाजता तो हरवला.. चिंताग्रस्त पालकांनी तत्काळ पोलिस हेल्पलाइन ‘१०९८’ व १०० वर संपर्क साधला. माहिती मिळताच कॉप २४ मार्शल्स व शिवाजीनगर पोलिस तात्काळ हलले.
शोधमोहीम व कारवाई
शिवाजीनगर, पुणे स्टेशन परिसर, मॉडर्न कॉलेज, भांडुर्गी मशीद परिसर आदी ठिकाणी तपासणी मोहिम राबवली गेली. गर्दीच्या वातावरणात मार्शल्स व पोलिसांनी मुलाचा फोटो दाखवत शोधमोहीम वेगाने सुरू ठेवली. अखेर मुलगा मॉडर्न कॉलेज परिसरात सापडला.
काळजी घेण्याचे आवाहन
मुलगा हरवल्याची माहिती मिळताच मार्शल्सनी पालकांना शांत राहण्याचे व पोलिसांशी संपर्क ठेवण्याचे आवाहन केले होते. पोलिसांनी “काळजी करू नका, मुलगा सापडेल” असा धीर दिला आणि ते खरे ठरले. कॉप २४ मार्शल्स व पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलगा सुखरूप सापडला. पालकांनी पोलिसांचे व मार्शल्सचे आभार मानले. दहीहंडीच्या गर्दीत हरवलेले बालक तासाभरात पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याने पोलिस व मार्शल्सचे कौतुक होत आहे."