लोणी काळभोरमध्ये गॅरेज मालकाची दुकानात गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 13:32 IST2022-11-01T13:32:08+5:302022-11-01T13:32:49+5:30
ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस....

लोणी काळभोरमध्ये गॅरेज मालकाची दुकानात गळफास घेऊन आत्महत्या
लोणी काळभोर (पुणे) : येथील पुणे-सोलापूर महामार्गाजवळ लोणी कॉर्नर परिसरात असलेल्या मातोश्री ऑटो गॅरेजच्या २७ वर्षीय तरुण मालकाने स्वतःच्या गॅरेजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
पवन कांबळे (वय २७, पूर्ण नाव माहिती नाही, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मातोश्री ऑटो गॅरेज नावाने पवन कांबळे यांचे गॅरेज आहे. पवन कांबळे हे सोमवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गॅरेजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी त्वरित ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने पवन कांबळे यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला आहे. पवन कांबळे यांचे मागील एक वर्षापूर्वी विवाह झाला आहे. पवन कांबळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.