दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार

By नम्रता फडणीस | Published: February 24, 2024 06:15 PM2024-02-24T18:15:49+5:302024-02-24T18:16:58+5:30

येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे...

In class X-XII exams, diagrams can now be drawn with a pen in the language subject answer sheet | दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार

दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या, तरी त्यांना गुण देण्यात यावेत असा निर्णय शनिवारी (दि. २४) बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंबंधी सर्व मुख्य नियामकांनादेखील सूचना दिल्या जाणार आहेत. येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

राज्य मंडळातर्फे सध्या इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू असून, येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. भाषा विषयासाठी मंडळाकडून कृती पत्रिकेवरील प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांसाठी काही वेळा आकृत्या काढाव्या लागतात. या आकृत्या पेनने काढाव्यात की पेन्सिलने? यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. तसेच दहावीच्या मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा विषयामध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती किंवा आकृत्या पेनाने काढल्या म्हणून अर्धा गुण कापतात. त्यांनी कापला नाही तर कित्येकदा मॉडरेटरच्या स्तरावर अर्धा गुण कापला जातो. यातच आकृती पेनाने काढावी, असा नियम प्रश्नपत्रिकेत आहे. मात्र, पेन्सिलने आकृती काढली तर अर्धा गुण कापावा असा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. मग हे गुण का कापले जातात? असा प्रश्न पर्यवेक्षक आणि माॅडरेटर विचारत होते.

त्यामुळे शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू होती. यावर शनिवारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करून ही संदिग्धता दूर करण्यात आली. भाषा विषयाच्या प्रश्नांसाठी पेन किंवा पेन्सिल कशानेही विद्यार्थ्यांनी आकृत्या काढल्या तरी त्यांना गुण देण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांच्या पेन व पेन्सिलने काढलेल्या आकृत्यांना गुण देण्याबाबत सर्व मुख्य नियामकांना सूचना दिल्या जाणार आहेत. पेन व पेन्सिलने आकृत्या काढण्याचा निर्णय हा केवळ भाषा विषयाच्या प्रश्नांसंदर्भात आहे. विज्ञान, गणित, भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनेच आकृत्या काढाव्या लागणार आहेत. आकृत्यांसंदर्भात निर्माण झालेल्या गोंधळामुळे बोर्डाच्या परीक्षा मंडळात याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे.

- शरद गोसावी, अध्यक्ष राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ

Web Title: In class X-XII exams, diagrams can now be drawn with a pen in the language subject answer sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.