पाईट (खेड) : नागमोडी वळणं पार करत पिकअप निघाली होती. त्यापाठोपाठ आमची दुचाकी होती. दोन्ही वाहनांमध्ये सुमारे ५०० मीटरच अंतर होते. सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास समोर ते पिकअप वाहन पुढे जाण्याएवजी मागे येताना माझे वडील संजय खेंगले यांना दिसले. क्षणातच ते वाहन आमच्या जवळून थेट १०० ते १५० फूट दरी कोसळले. या घटनेचे काही वेळ आमच्या काळजाचा ठोका चुकल्याचे प्रत्यक्षदर्शी विपुल संजय खेंगले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
प्रत्यक्षदर्शी विपुल संजय खेंगले आणि त्यांचे वडील संजय खेंगले यांनी सांगितले की, ते स्वतः देवदर्शनासाठी चालले होते. त्यांच्या गाडीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याचे त्यांना प्रथमदर्शनी दिसले. वाहन पुढे जाण्याऐवजी मागे येत होते आणि ब्रेक न लागल्याने सुमारे १०० ते १५० फूट खोल दरीत दोन पलट्या मारून कोसळले. या अपघाताचे भयानक दृश्य पाहून संजय खेंगले यांना भोवळ आली, तर विपुल यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. विपुल आणि संजय खेंगले यांनी तत्काळ इतरांना फोन करून मदत मागवली. पापळवाडी येथील सुनील खेंगले, प्रमोद खेंगले, रामदास खेंगले आणि इतर तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी रक्ताचा सडा आणि प्रचंड आक्रोश यामुळे उपस्थितांना काय करावे, हे सुचेना. तरीही, कोमलवाडी, पापळवाडी आणि पाईट येथील ग्रामस्थांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोलाची मदत केली.