Pune Crime: कल्याण-नगर महामार्गावर भरधाव कारने परप्रांतीयांना चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 15:03 IST2023-09-26T15:02:28+5:302023-09-26T15:03:09+5:30
जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. डिंगोरे येथे मध्यप्रदेशवरून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही शेतमजूर कामासाठी आले होते....

Pune Crime: कल्याण-नगर महामार्गावर भरधाव कारने परप्रांतीयांना चिरडले
उदापूर (पुणे) : कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडले. त्यामध्ये दोनजण जागीच ठार तर एक व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला आहे तसेच इतर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. डिंगोरे येथे मध्यप्रदेशवरून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही शेतमजूर कामासाठी आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास कल्याणवरून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.१२ व्ही.क्यु.८९०९) महामार्गावरील पायी चालत असलेल्या पाच परप्रांतीय मजुरांना जोरदार धडक दिली. या अपघातात जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले हे तिघेजण ठार झाले तर दिनेश जाधव विक्रम तारोले हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर घटनेची माहिती समजतात ओतूर पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन कांडगे यांची टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास ओतूर पोलिस करत आहेत. गेल्या चार-पाच दिवसात कल्याण महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. प्रशासनाने गावागावांलगत गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.