'काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा', राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:21 IST2025-11-06T16:20:27+5:302025-11-06T16:21:36+5:30
मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज यांनी नाराजी व्यक्त केली

'काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा', राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले
पुणे : नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महापालिकेच्याही लवकरच जाहीर होणार आहेत. या अनुषंगाने सर्वपक्षीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. तसेच पक्षांकडूनही निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र दोन्हीकडून अजूनही अधिकृत अशी काही घोषणा झालेली नाही. परंतु दोन्ही पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष यांची बैठक घेतली. त्यानंतर अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज राज ठाकरे यांच्याकडून शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखा अध्यक्षांची बैठक झाली. यावेळी काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा असे म्हणत ठाकरे यांनी शाखा अध्यक्षांना फटकारले. इतके दिवस काय काम केले हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारला. ज्यांनी काम केले नाही त्यांना काढून टाकण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले. बैठकीत राज हे प्रचंड संतापल्याचे दिसून आले. बैठकीत राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तसेच आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येऊन निवडणूक लढवतील, अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या मतचोरी विरोधातील लढाईत महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. मतचोरीच्या विरोधात मुंबईत काढलेल्या मोर्चात राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर तसेच शाखा अध्यक्षांबरोबर चर्चा केली आहे.