पुणे : देशात पंधरा लाख तरुण बेराेजगार आहेत. अमेरिकेने टेरिफ ५० टक्के केल्याने आयटी क्षेतात देखील बेराेजगारी वाढण्याचा धाेका निर्माण झाला आहे. नेपाळ, बांग्लादेश पेटलेले असतानाही सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही. वेळीच दखल घेतली नाही तर भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे. तसेच आंदाेलक विद्यार्थ्यांना मंत्रालयावर धडकण्याचे आवाहन केले.
डेक्कन येथील गुडलक चाैकात कलाकार कट्टा येथे संशाेधक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी मागील तीन दिवसांपासून आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला बुधवारी (दि. १७) भेट देऊन पाठिंबा जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बाेलताना त्यांनी हा इशारा दिला. या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनीही उपस्थित राहून आंदाेलकांना पाठिंबा दिला.
शासन दोनच गोष्टीला घाबरत, ते म्हणजे निवडणुकीवर परिणाम करील इतका मतदार हवा, किंवा उपद्रव मूल्य वाढवणारा समूह असावा. यातला दुसरा पर्याय आपल्यापुढे आहे. नेपाळ आणि बांगलादेश मधील घटनेनंतर विद्यार्थी शक्तीची भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी मुंबईत मंत्रालयात धडकने हाच एक पर्याय आहे. अन्यथा कुणीही आपली दखल घेणार नाही. स्कॉलरशी दर महिन्याला मिळालीच पाहिजे, असा नियम होता. आता वर्ष वर्ष प्रक्रियाच होत नाही. बजेट नाही असं म्हणता येत नाही. सर्वांना पैसा मिळाला आहे. त्या त्या संस्थांनी खर्च केला तर केंद्र सरकारचा देखील पैसा मिळेल. तेव्हा मंत्रालय हेच सेंटर करून भीतीचा फायदा घेत आपल्या मागण्या मान्य करून घेऊ यात. तुमच्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्यासाठी मी तुमच्या शिष्टमंडळासाेबत आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. मोहन जोशी यांनीही आंदाेलनाला पाठिंबा देत शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना वेळीच शिष्यवृत्ती देऊन संशोधनाला चालना द्यावी, यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसमवेत आहोत.
विद्यार्थ्यांचा निर्धार...
पोर्टलवर जाहिरात पडत नाही आणि सरसकट शिष्यवृत्ती लागू करत नाही, ताेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेऊ, असा निर्धार व्यक्त केला.