राजू इनामदार
पुणे : भाजपच्या राज्यात उधळलेल्या राजकीय वारूला लगाम घालायचा असेल तर उद्धवसेना-मनसे, पर्यायाने उद्धव ठाकरे-राज ठाकरे अशी युती लवकर अस्तित्वात यायला हवी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धवसेना या दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भावना आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शून्यात गेलेल्या दोन्ही पक्षांना मोठा फायदा होईल, अशी त्यांच्यात भावना आहे.
परदेशात गेलेल्या राज ठाकरेंनी मी परत येऊन काही बोलल्याशिवाय युतीबाबत कोणीही बोलू नये, असा आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे उघड कोणी बोलत नसले तरी खासगीत बहुसंख्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत हे ‘मराठी’चा अजेंडा टिकवायचा असेल युती व्हावी, अशी त्यांची भावना आहे.
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील परदेशात होते. त्यांनीही याविषयी माझ्याशिवाय कोणीही बोलणार नाही, असे बजावल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वांनीच मौन बाळगले आहे. राज-उद्धव हेच यावर चर्चा करून निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे. दोन्ही नेते परदेशातून परतल्यावर यावर चर्चा होईल, असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे.
दोन्ही पक्षांकडे याबाबत कानोसा घेतला असता पदाधिकाऱ्यांसह बहुतेकांचे मत युती व्हावी, असे दिसते. मनसेचे बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी एकटे लढून व सातत्याने अपयशाची चव चाखून त्रस्त झाले आहेत. त्यात भाजपने फसवणूक केली, शिंदेसेनेनेही धोका दिला, लोकसभेला प्रचार सभा घेतल्यानंतरही महायुतीने विधानसभेला किमान काही जागांची मदत करायला हवी ती केली नाही, त्यामुळे या सर्वांना राजकीय धडा शिकवायलाच हवा, तो उद्धवसेनेबरोबर युती केल्याने नक्की बसेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. एकटे लढून उपयोग होत नाही तर, आघाडी, युती काहीतरी करावे लागणारच, मग इतर कोणाशी करण्याऐवजी राजकीय व रक्ताचेही नाते असलेल्यांबरोबर केले तर काय बिघडेल, असे पक्षातील जाणकार करतात.
उद्धवसेनेतही हाच सूर आहे. राज यांच्या सभांना गर्दी होते, हे वास्तव आहे. दोघांचा ‘मराठी’चा मुद्दा सारखाच आहे. हिंदुत्वाच्या मुद्दाही त्यांनी उचलला आहे. शिवसेनेतून राज बाहेर पडले असले तरी शिवसेनेच्या विचारांशिवाय वेगळे काही बोलत नाहीत. त्यामुळे युती करण्यात गैर काय, असे शिवसैनिकांना वाटते. भाजपने केलेली फसवणूक शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. शिंदेसेनेने चिन्हासह पक्ष पळवला. त्यांना रोखठोक राजच उत्तर देऊ शकतील. विधानसभा निवडणुकीपासून शिवसैनिकांचा राजकीय आत्मविश्वास खचल्यासारखा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला असे खचलेल्या मनाने सामोरे जाणे योग्य नाही. राज ठाकरे बरोबर आले तर नवे वारे तयार होईल, ते मतदारांच्या मनात नक्की विश्वास निर्माण करेल, असे शिवसैनिक बोलून दाखवतात.
दोन्ही पक्ष एका चालकानुवर्ती आहेत. त्यामुळे ते ठरवतील तेच धोरण व ते बांधतील तेच तोरण, अशी दोन्ही पक्षांची अवस्था आहे. बरोबर येण्याचा किंवा न येण्याचा अंतिम निर्णयही तेच दोघे घेणार आहेत. फक्त त्यांनी तो ऐनवेळी न घेता पुरेसा कालावधी देऊन घ्यावा, असे दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.