पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फूड कोर्ट येथील चायनीज गाळ्यावर घेतलेल्या जेवणात रबर सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ते पोटात गेले असते तर?... हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणारा असून, यावर विद्यापीठाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. गाळा मालकांनी मात्र आरोपात तथ्य नाही, असे सांगितले आहे.
हिंदी विभागाचे विद्यार्थी काहीतरी खाण्यासाठी म्हणून चायनीज गाळ्यावर गेले. फ्राइड राइस व नूडल्सची त्यांनी ऑर्डर दिली. ते खात असताना अचानक रबर आढळून आले. याबाबत भोजन समिती प्रमुख राजेंद्र गाडे यांच्याशी संपर्क साधला; पण संपर्क झाला नाही. भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती सदस्य तथा विद्यार्थी शिवा बारोळे याने सांगितले की, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच पोषक अन्न मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणी खेळत असेल, तर प्रशासनाने वेळीच लक्ष घालून उपाययोजना करावी.