'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

By हेमंत बावकर | Updated: July 28, 2025 11:07 IST2025-07-28T11:05:17+5:302025-07-28T11:07:27+5:30

Hinjawadi IT Park Traffic, Companies: हिंजवडी एकटी बुडणार नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांना सोबत घेऊन बुडणार आहे हे नक्की...

If 'Hinjawadi' IT park is lost, who will lose? Pune or Maharashtra...; How much has it changed in 15 years... | 'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

- हेमंत बावकर

राज्यात सध्या हिंजवडीच्या वाट्टोळे झाल्यावरून जोरदार खळबळ उडाली आहे. तत्कालीन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडपासून हाकेच्या अंतरावरील हिंजवडी गावात आयटी पार्क उभारण्याच्या कामी मोठी शक्ती खर्च केली होती. इन्फोसिस, टेक महिंद्रासारख्या मोठमोठ्या कंपन्या तिथे वसल्या होत्या. हिंजवडीला जाणारे रस्ते तेव्हा पुरेसे होते, कारण तेव्हा वाहने जास्त नव्हती. अधिकतर मोटरसायकलीच आणि टेक कंपनीत मोठ्या पदावर असलेल्यांचाच तेवढ्या कार असा गोतावळा हिंजवडीकडे ये-जा करत होते. परंतू, गेल्या ५-६ वर्षांत हिंजवडीच्या आयटीपार्कमध्ये फोर व्हीलरची ये-जा वाढली ती कोरोनामुळे आणि सुरु झाली ती प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या. 

आज आयटीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक जोडप्याकडे दोन चारचाकी आहेतच आहेत. एकच असेल तरी ती छोटी नाही तर एसयुव्हीच. यामुळे हिंजवडीकडे जाणारे रस्ते अपुरे पडू लागले. एका कारमध्ये एकच जण. पाऊस, थंडी, उन असले की बघायलाच नको. रस्ते तुडुंब वाहनांनी भरलेले असतात. वाकड, पुनावळे, ताथवडे, बावधन, कोथरुड आणि पुणे-पिंपरी चिंचवडच्या इतर भागातून आयटी पार्कमध्ये नोकरी करणाऱ्यांनी घरे घेतली. पार अगदी आळंदी मोशीपर्यंत हे लोक राहत आहेत. अनेकांनी मगरपट्टा, खराडी आयटी पार्क आणि हिंजवडी सेंटर पडेल असा औंध, बाणेर, बोपोडी, खडकी भाग निवडला आणि मग सुरु झाली ती त्यांची आणि त्यांच्या कंपन्यांची कोंडी. 

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीच्या सरपंचाला वाट्टोळे केले असे चारचौघात म्हटले आणि पुन्हा हिंजवडीची चर्चा सुरु झाली. काल वृत्त आले की हिंजवडीतून ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले. हे ऐकायला, वाचायला एवढेही सोपे नाही. ३७ कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करत होते. त्यांना हजारो लोक सेवा पुरवत होते. याच कँटीन, सफाई, इलेक्ट्रीशिअन, या सर्वांना वस्तू पुरविणारे आहेत. हे हजारो कर्मचारी त्यांचा लाखांमध्ये मिळणारा पगार बँकांचे ईएमआय, घरांचे भाडे, दुकाने, मॉल, दूध, भाजीपाला यासाठी खर्च करत होते. ते गेले. कुठे हैदराबाद, बंगळुरुला. म्हणजेच राज्याचा जीएसटी स्वरुपातील मोठा महसूल गेला. पुण्याचा महसुल गेला. त्याहून जास्त तोटा म्हणजे घरभाडे, दूध, भाजीपाला पुरविणाऱ्यांचा पैसा गेला.

अजित पवार उगाच म्हणाले नाहीत, वाट्टोळे झाले म्हणून. काकांनी आपल्या काळात उभारलेली महाराष्ट्राची ही संपत्ती पुतण्याच्या काळात जाताना त्याना पहावे लागत आहे. हिंजवडी आयटी पार्क जर हातचा गेला तर सर्वाधिक नुकसान पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड गेल्या १०-१५ वर्षांत भरमसाठ वाढले आहे. २००९ मध्ये पुण्यातील रस्ते रिकामे असायचे. हिंजवडीतीलही रस्ते रिकामे असायचे. तुम्ही स्कुटरने जा की कारने तुम्हाला कुठेही अडकावे लागत नव्हते. परंतू, या काळात हिंजवडीच्या आजुबाजुला पुणे पिंपरी चिंचवडच्या आजुबाजुला एवढ्या इमारती वाढल्या की आज तिथून वाट काढणेदेखील मुश्कील बनलेले आहेत. पूर्वी या भागात शेती होती. पूर्ण शेती. ती आता बिल्डरांना विकून, विकसित करून त्याजागी मोठमोठ्या सोसायट्या उभ्या ठाकल्या आहेत. ८-१० लाखांना मिळणारे फ्लॅट आता ७०-८० लाखांपासून पुढे १,२,३ कोटींवर कधी गेले समजलेच नाही. 

सर्वात मोठा फटका कुणाला...

हिंजवडी आयटी पार्क गेल्याचा सर्वात मोठा फटका या आयटी कर्मचाऱ्यांनाच बसणार आहे. कारण त्यांनी लाखोंमध्ये पॅकेजेस असल्याने कोटींमध्ये किंमती असलेली घरे घेतलेली आहेत. पार्क गेला की या भागातील घरांची मागणी कमी होणार, मागणी कमी झाली की पर्यायाने रिअल इस्टेटचे दर कोसळणार. कर्मचारी कंपनी गेल्याने एकतर दुसरीकडे नोकरी शोधतील किंवा ते देखील बंगळुरू, हैदराबादची वाट धरतील. म्हणजेच हे घर रिकामे होईल किंवा भाडेकरूही मिळणार नाही. ज्यांनी भाड्याने घरे दिलीत ती देखील रिकामी राहतील. अशावेळी त्यांना करोडोत घेतलेले घर कमी किंमतीत विकावे लागणार किंवा बाजारात प्रॉपर्टीच्या किंमती कमी झालेल्या असताना आधी जास्त किंमतीने घर घेतलेले असल्याने त्याचे ईएमआय भरावे लागणार आहेत. हिंजवडी आयटी पार्क गेल्याची सर्वात मोठी किंमत या तरुण पिढीला मोजावी लागणार आहे. महापालिका त्यांचा कर लादतच राहणार, वसुलही करत राहणार आहेत. सरकारला जीएसटीच्या स्वरुपात त्या घरांचा पैसाही मिळाला आहे. राजकारण्यांनी आपले पैसे कमावून घेतले आहेत. पण ज्यांनी घरासाठी पैसे गुंतविले आहेत त्यांचा पैसा बुडणार आहे. तेथील लोकांचे उत्पन्न बुडणार आहे. हिंजवडी एकटी बुडणार नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांना सोबत घेऊन बुडणार आहे हे नक्की. 

Web Title: If 'Hinjawadi' IT park is lost, who will lose? Pune or Maharashtra...; How much has it changed in 15 years...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.