एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्यास आम्ही पुणे महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावरती लढू - रवींद्र धंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:57 IST2025-06-11T18:57:00+5:302025-06-11T18:57:40+5:30
पुणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची आपली तयारी असून सैन्य तयार आहे फक्त आदेशाची वाट पाहत आहोत

एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्यास आम्ही पुणे महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावरती लढू - रवींद्र धंगेकर
पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने सर्व पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. पक्ष वरिष्ठांच्या बैठकही सुरु झाल्या आहेत. अशातच पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. २०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करावी, असे आदेश राज्यसरकारच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे पुण्यात प्रभाग संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६५ राहणार आहे.
प्रभाग रचनेचा आदेश येताच शिवसेनेचे रवींद्र धंगेकर ॲक्टिव्ह झाल्याचे दिसून आले आहेत. त्यांनी निवडणुकांसाठी स्वबळाचा लढण्याचा नारा दिला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी आहे. पुण्यातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. पुणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची आपली तयारी आहे. शिंदे साहेबांनी आदेश दिल्यास आम्ही सर्व जागा स्वबळावरती लढू. सैन्य तयार आहे फक्त आपण आदेशाची वाट पाहत आहोत अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
रवींद्र धंगेकर यांचा विधानसभेत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पक्ष बदलून शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. शिवसेना पुणे महानगरप्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली. आता त्यांनी महापालिका निवडणुकीच्या लढण्याच्या दृष्टीने तयारी दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची आम्ही वाट बघत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी स्वबळावरती लढण्याचा नारा दिला आहे.
प्रभाग रचनेची अशी होणार प्रक्रिया
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पालिका आयुक्तांनी सादर करावी. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यावर असणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना आयुक्तांनी प्रसिद्ध करावी. त्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनावर राज्यसरकारने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. या हरकती सुनावणीनंतर अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. त्यानंतर पालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करावी असे राज्यसरकारने आदेशात नमूद केले आहे.