पुण्यातील जोडप्याचा आदर्श ; अवघ्या १५० रुपयात केले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 19:27 IST2019-05-20T19:26:30+5:302019-05-20T19:27:50+5:30
लाखो रुपये खर्च करून प्रसंगी कर्ज काढून लग्न समारंभाचे आयोजन केले जात असताना पुण्यातील जोडप्याने मात्र अवघ्या १५० रुपयात लग्न करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

पुण्यातील जोडप्याचा आदर्श ; अवघ्या १५० रुपयात केले लग्न
पुणे :लाखो रुपये खर्च करून प्रसंगी कर्ज काढून लग्न समारंभाचे आयोजन केले जात असताना पुण्यातील जोडप्याने मात्र अवघ्या १५० रुपयात लग्न करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
जगदीश व छाया ओहोळ असे या दाम्पत्याचे नाव असून त्यांनी पुण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात लग्नगाठ बांधली. जगदीश सध्या मळवली येथे शिक्षक असून छाया कात्रज येथील महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करतात. मात्र एवढ्यावर न थांबता लग्नाची भेट म्हणून येणाऱ्या नातेवाईक आणि आप्तेष्टांना ते संविधानाही प्रत व रोपांचं वाटप करणार आहे. विवाहाच्या दिवसाचे औचित्य साधत त्यांनी अवयवदानाचा फॉर्मही भरला आहे.
याबाबत जगदीश लोकमतशी बोलताना म्हणाले की, 'महाराष्ट्रात एवढा प्रखर दुष्काळ असून ही ऐपत नसताना कर्ज काढून लाखोंचा खर्च करून, बँड, बाजा, बारात, रोषणाई, डीजे लावून केलेले विवाह सर्रास पहायला मिळतात. अनेक प्रबोधनकारांनी 'विवाह साध्या पद्धतीने करा' असे सांगूनही समाजपरिवर्तन होताना दिसत नाही. या परिवर्तनाची सुरुवात स्वतः पासून करायची अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही लग्न केले आहे. यातून एका जरी जोडप्याने आदर्श घेतला तरी आम्हाला त्याचे समाधान असेल.