'तिला भेटल्यास तुला सोडणार नाही...' भावाने अपहरण करून तरुणाला नेले जंगलात
By विवेक भुसे | Updated: September 26, 2022 15:26 IST2022-09-26T15:26:20+5:302022-09-26T15:26:59+5:30
परवानगीशिवाय नियोजित पत्नीला भेटायला आल्याने तिच्या भावाने इतरांच्या मदतीने तरुणाचे अपहरण करुन त्याला जंगलात नेले

'तिला भेटल्यास तुला सोडणार नाही...' भावाने अपहरण करून तरुणाला नेले जंगलात
पुणे : परवानगीशिवाय नियोजित पत्नीला भेटायला आल्याने तिच्या भावाने इतरांच्या मदतीने तरुणाचे अपहरण करुन त्याला जंगलात नेले व त्याला बेदम मारहाण करुन बहिणीला भेटल्यास तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. ही घटना वडगाव येथील जाधवनगर व कुडजे गावाच्या पुढे जंगलात २४ सप्टेबर रोजी मध्यरात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथे राहतो. त्याचा धायरी येथील एका तरुणीबरोबर विवाह निश्चित झाला आहे. वडगाव येथील जाधवनगरमध्ये तो आपल्या होणाऱ्या पत्नीला भेटायला गेला होता. त्यावेळी आपल्या परवानगीशिवाय बहिणीला भेटायला आला याचा तिच्या भावाला राग आला. तो आपली बहीण व फिर्यादी यांना जबरदस्तीने रिक्षा बसवून कुडजे गावाचे पुढे जंगलात घेऊन गेला. तेथे त्याने कंबरेच्या बेल्टने, दगडाने व लाकडी बांबुने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. परत आमच्या बहिणीला भेटलास तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर आता या तरुणाने फिर्याद दिली असून सिंहगड रोड पोलिसांनी फिर्यादी याच्या होणाऱ्या पत्नीचा भाऊ व त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निकम तपास करीत आहेत.