'शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेन', तरुणीला धमकी देऊन उकळले ३४ लाख
By विवेक भुसे | Updated: July 14, 2022 16:57 IST2022-07-14T16:57:27+5:302022-07-14T16:57:53+5:30
तरुणीने फ्लॅट विक्री, पगाराची रक्कम, बचत गमावली

'शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेन', तरुणीला धमकी देऊन उकळले ३४ लाख
पुणे : एका तरुणीला प्रेमात अडकवून तिच्याबरोबरील शारीरीक संबंधाचा व्हिडिओ काढला. तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने फ्लॅटविक्रीचे पैसे, बचत आणि पगाराचे पैसे असे ३३ लाख ९३ हजार ७२१ रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली.
याप्रकरणी पुलगेट येथे राहणार्या एका ३३ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोहेल अजीम सय्यद (वय ३२, रा. ईशा हाईटस, कोंढवा खुर्द) व त्याच्या ४ नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१७ ते २०१९ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सोहेल सय्यद याच्यबरोबर ओळख होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. फिर्यादी या सोहेल याच्या घरी गेल्या असताना त्याने कोल्ड्रींक्समधून कसले तरी गुंगीकारक औषध दिले. फिर्यादी या बेशुद्ध झाल्यावर त्याने त्यांचे कपडे काढून त्यांच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्याचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ मीडियामध्ये व्हायरल करेल, अशी धमकी देऊन त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच फिर्यादीवर वेळोवेळी शरीर संबंध ठेवून त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांचा फ्लॅट विक्री करुन विक्रीचे पैसे, फिर्यादीचे बचतीचे तसेच पगाराचे पैसे असे एकूण ३३ लाख ९२ हजार ७२१ रुपये त्यांच्याकडून वेळोवेळी घेऊन ते परत न करता फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस तपास करीत आहेत.