'मी म्हणतो आम्ही खेचून घेणार"; फडणवीसांच्या 'निवडून येणार'ला अजितदादांचं पॉवरफुल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:35 IST2021-02-12T15:34:36+5:302021-02-12T15:35:01+5:30
आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवून जिंकू शकतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

'मी म्हणतो आम्ही खेचून घेणार"; फडणवीसांच्या 'निवडून येणार'ला अजितदादांचं पॉवरफुल उत्तर
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. या निवडणुकांसाठी आतापासूनच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे शहराचे दौरे वाढवले असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेतल्या जात आहेत. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच आम्हांला कोणाची गरज नाही आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवून जिंकू शकतो ,असा आत्मविश्वास दाखविला आहे. आता त्याला उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 'पॉवरफुल' प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, पुणे महानगरपालिका सत्ताधारी पक्ष म्हणतात की आम्ही निवडुन येणार आणि विरोधी पक्ष म्हणतो आम्ही खेचुन घेणार, पण मी म्हणतो आम्ही खेचुन घेणार असा जोरदार पलटवार अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.
विधानसभा अध्यक्षांबाबत आधीच निर्णय झाला आहे. ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्याबाबत काही बदल करायचा असेल तर त्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते असलेले शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे घेतील.
उदयनराजे काही वेगळ्या कामासाठी गेले. त्यात दुसरी काही कारणे नाहीत. ज्यांना पक्षात यायचे आहे त्यांचे वाजत गाजत स्वागत आहे. इलेक्टिव्ह मेरीट असणाऱ्यांचे पहिले स्वागत करण्यात येणार असल्याचे पवार यांनी यावेळी खासकरून सांगितले.