३०-४० लोकांनी मारलंय;त्याच उत्तर विचारायला आलो होतो;घाडगे अजितदादांना न भेटताच लातूरला परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:31 IST2025-07-25T14:30:15+5:302025-07-25T14:31:10+5:30
पुणे : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी ...

३०-४० लोकांनी मारलंय;त्याच उत्तर विचारायला आलो होतो;घाडगे अजितदादांना न भेटताच लातूरला परतले
पुणे : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या २-३ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.
या मारहाणीचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण कडून मारहाण झालेले विजय घाडगे आज पुण्यात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु घाडगे आता अजित पवारांना न भेटताच लातूरला जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
घाडगे म्हणाले, मी अजित पवार यांना भेटायला निघालो. ते पुण्यात असल्याने मी सकाळपासून पुण्यात मुक्काम केला. दुपारपर्यंत त्यांचा निरोप आला नाही. आता त्यांचा निरोप आला की, ५ लोकांचं शिष्टमंडळ भेटायला आलं पाहिजे. मला ३०, ४० लोकांनी मारलं आहे. माझ्यासोबत शेतकऱ्याची पोर आली आहेत. आम्ही चुकीच्या पद्धतींने काही करणार नाही असा शब्द दिला होता. तरी आम्हाला असं सांगण्यात आले की, ५ लोकांचं शिष्टमंडळ भेटायला पाठवा. माझ्यावर हल्ला झाला त्याच उत्तर विचारायला आम्ही आलो होतो. तुमचा प्रदेशाध्यक्ष चुकला आहे. हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोरावर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर हल्ला झाला आहे. मी मीडियाला घेतलयाशिवाय दादांना भेटणार नाही. मी लातूरला चाललो आहे. मी एकटा भेटायला येतो असे सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही. आता मी सरळ थेट लातूरला जात आहे. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या २-३ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले. त्यादिवशी रात्री रोडवर छावाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर फाडून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त घातली. कुणीही कायदा हातात घेऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील होते.