पुणे : पत्नी नोकरी करणारी आणि शिक्षित असली तरी आणि दोन्ही मुलांचे पालनपोषण करण्यास सक्षम नसली तरी पती त्याची कायदेशीर जबाबदारी म्हणून पत्नीला पोटगी देण्यास जबाबदार आहे असे निरीक्षण नोंदवित, पत्नीसह मुलांचे शिक्षण आणि घरभाडे अशी एकूण ६५ हजार रुपयांची दरमहा अंतरिम पोटगी देण्याचा आदेश लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग दंडाधिकारी अमित अनिल कुलकर्णी यांनी पतीला दिला आहे.स्मिता आणि राकेश ( नावे बदललेली) या दोघांचा प्रेमविवाह हिंदू विवाह कायद्यानुसार २००७ मध्ये झाला. राकेश वकिली व्यवसायात आहे तर स्मिता एका विमा कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदावर काम करते. दोघांना दोन मुले आहेत. काही वर्षांनंतर दोघांचे पटेनासे झाले. ती पतीपासून वेगळी राहू लागली. मुलेही तिच्यासोबत राहात आहेत. पाच वर्षांपासून तो स्मिताला पैसे देत नव्हता. त्यामुळे मुलांना ती एकटीच सांभाळत होती. अखेर तिने शारिरीक , मानसिक आणि आर्थिक निकषांच्या आधारावर कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत अँड. मयूर पुरुषोत्तम साळुंके आणि अँड अजिंक्य पुरुषोत्तम साळुंके यांच्यामार्फत केस दाखल केली. अँड. मयूर साळुंके यांनी पतीच्या विवाहबाहय संबंधांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. पतीचे उत्पन्न किती आहे याची माहिती पत्नीने वकिलांमार्फत सादर केली. त्याप्रमाणे तिने तिच्यासह मुलांच्या शिक्षणासाठी पोटगीची मागणी केली. पत्नी नोकरदार असूनही मुलांना तिला एकट्याने सांभाळावे लागत असल्याने न्यायालयाने पत्नीला ३० हजार रुपये, घरभाडयासाठी १५ हजार रुपये आणि मुलांच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये अशी एकूण मिळून ६५ हजार रुपयांची अंतरिम पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले आहेत. अँड. मयूर पुरुषोत्तम साळुंके आणि अँड. अजिंक्य पुरुषोत्तम साळुंके यांना अँड. अमोल खोब्रागडे आणि अँड. पल्लवी मयूर साळुंके यांनी सहकार्य केले.
पत्नी नोकरीत असूनही पतीला ६५ हजार पोटगी द्यावी लागणार; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
By नम्रता फडणीस | Updated: February 4, 2025 20:12 IST