पुणे : वाघोलीतील दैनंदिन बाजारात फळ विक्री पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागनाथ वारुळे (वय ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला असून आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरातील आव्हाळवाडी येथे नागनाथ आणि उज्वला हे दाम्पत्य राहत होते. दोघे वाघोलीतील बाजारात फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. मेहनत आणि कष्ट करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांना आर्थिक अडचण असल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सततच्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वारुळे दाम्पत्य कष्टाळू आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वारुळे दाम्पत्य कष्टाळू आणि शांत स्वभावाचे होते. कष्टाळू दाम्पत्याच्या टोकाच्या निर्णयाने अनेकांना धक्काच बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. वाघोली पोलीस मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी सखोल तपास करत असून, नातेवाईक आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.