नीरा नदीपात्रातील आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 20:56 IST2018-03-26T20:52:22+5:302018-03-26T20:56:19+5:30
नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी निरवांगी या ठिकाणच्या पात्रात आमरण उपोषणास शेतकरी बसलेले आहेत.

नीरा नदीपात्रातील आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच
निरवांगी : नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, यासाठी उपोषणास बसलेल्या तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे. या शेतकऱ्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे.श्रीरंग यशंवत रासकर, वैभव अरुण जाधव, चंद्रकांत साहेबराव फडतरे अशी त्यांची नावे आहेत. तर या पूर्वी अजिनाथ सुदाम कांबळे, शंकर शंभू होळ या शेतकऱ्यांना देखील प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे. नीरा नदीचे पात्र गेले दोन ते तीन महिने पाण्यावाचून कोरडे पडलेले आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील कळंब, निमसाखर, बोराटवाडी, दगडवाडी, निरवांगी, खोरोची, चाकाटी, पिटेवाडी, निरनिमगाव, भगतवाडी, सराटी, लमुवाडी, गिरवी, वजरे व नीरानृसिंहपूर, तर माळशिरस तालुक्यातील कळंबोली, पळसमंडळ, कदमवाडी, उंबरेदहिगाव, चाकाटी, कोडबावी, आनंदनगर आदी गावांतील जनता पाण्यासाठी तहानली आहे. मागील काही महिन्यांपासून नदीच्या पात्रात पाणी नाही. जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने हाल होऊ लागले आहेत. नदीपात्रातच पाणी नसल्याने नदीकिनारी असणाऱ्या विहिरींची पाणीपातळी प्रचंड खालावली आहे, तर काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी निरवांगी या ठिकाणच्या पात्रात आमरण उपोषणास शेतकरी बसलेले आहेत. या उपोषणस्थळी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी पाठिंबा देण्यासाठी दररोज येत आहेत. नदीच्या पात्रात आमरण उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नीरा नदीच्या पात्रात किनारी असलेल्या गावातील महिला व लहान मुलांनाही पाठिंबा दिला. वयोवृद्ध आजी ही नदीच्या पात्रात येऊन धीर देत आहेत.
नदीपात्रात उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचा संवाद करून दिला.