आळेफाटा : आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत कुक्कुटपालन, गाईगोठा अशा योजनांसाठी २५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज प्रकरण मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिस ठाण्यात शशिकांत नामदेव कुन्हाडे (रा. आळे) व भाऊसाहेब नाना बोरचटे (रा. बेल्हे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय विलास पिंगट यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ ऑक्टोबर २०२४ रोजी शशिकांत नामदेव कुन्हाडे, भाऊसाहेब नाना बोरचटे यांनी आपण अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये कामाला असून, शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत कुक्कुटपालन, गाईगोठा अशा योजनांसाठी शासनाच्या माध्यमातून २५ लाख रुपये कर्ज प्रकरण मंजूर करून देतो, असे आमिष संजय पिंगट यांना दाखवले. सदर कर्ज मंजूर करून घेण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ४ लाख ९८ हजार ९०० रुपये घेतले. वेळोवेळी भूल थापा देत कर्जप्रकरण मंजूर करणेकरिता घेतलेली एकूण रक्कम परत न करता फसवणूक केली.तसेच गावातील सुनीता रमेश बांगर, कविता किशोर तांबे, सारीका सचिन बोरचटे, वंदना भास्कर नरवडे, सुवर्णा ईश्वर पिंगट, कविता सुभाष बोरचटे तसेच इतर बऱ्याच लोकांची फसवणूक केली आहे, असे पिंगट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही आरोपींना १३ फेब्रवारी सकाळी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.खोट्या एफडी पावत्या शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत कुक्कुटपालन, गाईगोठा अशा योजनांसाठी शासनाच्या माध्यमातून २५ लाख रुपये कर्ज प्रकरण मंजूर करून देतो, असे आमिष दाखवत स्वतःच्या खात्यात प्रत्येक शेतकऱ्याकडून लाखो रुपये वेळोवेळी उकळले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना दि नॅशनल को-ऑप. बँक लि. नावाच्या खोट्या एफडी पावत्या दिल्या.
कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक; जुन्नर येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:27 IST