पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घरफोड्या करणारी के. आर. टोळी जेरबंद; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By नारायण बडगुजर | Updated: August 17, 2023 19:35 IST2023-08-17T19:34:19+5:302023-08-17T19:35:39+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली...

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घरफोड्या करणारी के. आर. टोळी जेरबंद; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या के. आर. टोळीचा म्होरक्या किरण राठोड याच्यासह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चोरीचे दागिने घेणाऱ्या तीन सोनारांना देखील करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
किरण गुरुनाथ राठोड (वय २६, रा. दिघी), अर्जुन कल्लप्पा सूर्यवंशी (वय १९, रा. कोरेगाव भीमा), संतोश जयहिंद गुप्ता (वय १८, रा. खंडोबा माळ, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी -चिंचवड शहर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून घरफोड्या करणारा के. आर. टोळीचा म्होरक्या दिघी परिसरात ओळख लपवून वास्तव्य करीत आहे, अशी माहिती दरोडा विरोधी पथकातील दिवंगत पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये यांना मिळाली. त्यानुसार दिघी परिसरात सापळा लावून किरण राठोड याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कार, १८७ ग्रॅम सोने, एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण १२ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
किरण राठोड हा पाच घरफोड्या आणि एक दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपींनी चोरलेले दागिने कोरेगाव भीमा येथील दोन आणि परभणी येथील एका सराफ व्यावसायिकाकडे विकला. या तीनही व्यावसायिकांसह दागिने विक्रीसाठी मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी आरोपी केले.
पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश हिंगे, गणेश कोकणे, उमेश पुलगम, समीर रासकर, अमर कदम, महेश खांडे, नितीन लोखंडे, सागर शेडगे, राहुल खारगे, चिंतामण सुपे, औदुंबर रोंगे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलिस अंमलदाराचे अवयव दान
दरोडा पथकाचे पोलिस अमंलदार राजेश कौशल्ये यांनी या कारवाईत मोठी कामगिरी केली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी राजेश यांचे अवयव दान केले. मृत्यूनंतरही राजेश हे समाजासाठी आदर्श घालून गेले.