चोरट्यांनी फोडले पु. ल. देशपांडे यांचे भांडारकर रस्त्यावरील निवासस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:49 IST2017-12-19T13:13:34+5:302017-12-19T13:49:10+5:30
भांडारकर रोडवरील पु. ल. देशपांडे यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ परंतु, घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळाले नाही.

चोरट्यांनी फोडले पु. ल. देशपांडे यांचे भांडारकर रस्त्यावरील निवासस्थान
पुणे : भांडारकर रोडवरील पु. ल. देशपांडे यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ परंतु, घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळाले नाही़
भांडारकर रोडवर मालती माधव या इमारतीत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे रहायला होते़ सध्या तेथे कोणीही राहत नाही़ पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली़ पु़ ल़ देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर हे अमेरिकेला असतात़ अमेरिकेहून ते आज पहाटे मुंबईला आले व तेथून ते सकाळी पुण्यात दाखल झाले़ बंद घर पाहून चोरट्यांनी ते फोडून आत चोरी करण्याचा प्रयत्न केला़ घरातील कपाटांमध्ये उचकपाचक केली़ परंतु, तेथे त्यांना काहीही मिळाले नाही़ आसपासच्या तीन ते चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला आहे़ परंतु, त्यात काय चोरीला गेले याची माहिती मिळाली नाही़
या घटनेची माहिती मिळताच डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़
पु. ल. देशपांडे यांच्या निधनानंतर २००९ मध्ये त्यांच्या पत्नी सुनिताताई यांचेही निधन झाले़ त्यानंतर त्यांचे हे घर बंदच असते़ बंद घर पाहून यापूर्वी चोरट्यांनी एप्रिल २०१२ मध्ये घरात शिरुन चोरीचा प्रयत्न केला होता़ चोरट्यांनी घरातील पुस्तके अस्ताव्यस्त करुन टाकली़ पण, त्यांना काहीही मिळाले नव्हते़
घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ
शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाली असून उपनगरांमध्ये दररोज किमान ३ ते ४ घरफोडीचा घटना होताना दिसत आहे़ या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी त्या रोखण्यात अजून तरी पोलिसांना यश आलेले दिसून येत नाही़