पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आलेल्या गुंडाकडून धानोरी जकात नाका भागातील हाॅटेलची तोडफोड केली. गुंडाने हाॅटेल चालकाला धमकावून दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. हाॅटेल व्यवस्थापकासह मालकाला मारहाण केली. याप्रकरणी गुंडासह आठ जणांविरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी सराईत गुंड रोहन अशोक गायकवाड, गणेश राठोड यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत हाॅटेल चालक अन्सार गफूर शेख (३२, रा. मुंजाबा वस्ती, धानाेरी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन गायकवाड याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे, मारामारी, तसेच खंडणी मागणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे विमानतळ आणि येरवडा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. २०२२ मध्ये विमानतळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर गायकवाड आणि साथीदार येरवडा कारागृहात होते. गायकवाडने याप्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळवला होता.
त्यानंतर गायकवाड आणि साथीदारांनी पुन्हा धानोरी परिसरात दहशत माजवण्यास सुरुवात केली होती. शनिवारी (दि. १८) रात्री साडेअकराच्या सुमारास गायकवाड आणि साथीदार धानोरी जकात नाका परिसरातील हाॅटेल आमिरमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. त्या वेळी तेथे काही तरुण जेवण करत होते. गायकवाड आणि साथीदारांनी हाॅटेलमधील ग्राहकांना शिवीगाळ करुन त्यांच्याशी भांडणे सुरू केली. हाॅटेल मालक अन्सार शेख यांनी भांडणे सोडवून गायकवाड आणि साथीदारांना बाहेर जाण्यास सांगितले. गायकवाड आणि साथीदार तेथून निघून गेले.
काही वेळेनंतर गायकवाड आणि साथीदार पुन्हा हाॅटेलमध्ये आले. त्यांनी हाॅटेल मालक शेख यांना शिवीगाळ करुन हाॅटेलमध्ये तोडफोड सुरू केली. हाॅटेलचे व्यवस्थापक शरीफ शेख यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. शरीफ जखमी झाले. हाॅटेल मालक अन्सार यांना धक्काबुक्की करुन त्यांना धमकी दिली. हाॅटेल सुरू ठेवायचे असेल, तर दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे तपास करत असून, पसार झालेल्या गायकवाड आणि साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.