LPG Gas Crisis: गॅस टंचाईने जेजुरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; तब्बल १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:48 IST2026-03-28T12:44:19+5:302026-03-28T12:48:52+5:30

शासनाने २० टक्के व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली असली, तरी गेल्या १५ दिवसांत एकही सिलिंडर उपलब्ध झाला नसल्याने हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहे

Hotel business in Jejuri in crisis due to gas shortage As many as 130 hotels on the verge of closure | LPG Gas Crisis: गॅस टंचाईने जेजुरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; तब्बल १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर

LPG Gas Crisis: गॅस टंचाईने जेजुरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; तब्बल १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत यात्रा, जत्रा, लग्नसराई आणि शाळांच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची संख्या वाढत असताना, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे येथील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास जेजुरीतील सुमारे १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती जेजुरी व पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनने दिली.

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरी व पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या अडचणी मांडण्यात आल्या.

जेजुरी हे खंडोबा देवाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर यात्रा, जत्रा, कुलधर्म-कुलाचार, लग्नसराई यामुळे भाविकांची वर्दळ असते. सध्या भाविकांची संख्या वाढली असली, तरी हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलिंडर मिळत नसल्याने व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. शासनाने २० टक्के व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली असली, तरी गेल्या १५ दिवसांत एकही सिलिंडर उपलब्ध झाला नसल्याने हॉटेल, धाबे आणि खाद्यपदार्थांची दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे असोसिएशनचे प्रमुख विजय झगडे यांनी सांगितले.

गॅसला पर्याय म्हणून काही हॉटेल्समध्ये सरपण व कोळशावर चुली पेटवून पदार्थ तयार केले जात आहेत. मात्र, सुमारे दीडशे पदार्थांपैकी केवळ दहा-बारा पदार्थच तयार करता येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. हॉटेल बंद केल्यास कामगार निघून जातील आणि पुन्हा कामगार मिळणे कठीण होईल, या भीतीने हॉटेल्स कसाबसा सुरू ठेवण्यात येत आहेत. भाविकांना अपेक्षित नाश्ता व जेवण मिळत नसल्याने त्याचा परिणाम पर्यटन व व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

जेजुरी येथील यात्रा-जत्रांच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे विजय झगडे यांनी सांगितले. यावेळी आप्पा बयास, पंकज रहाटेकर, गणेश गाढवे, अक्षय दरेकर आदी व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.

दरम्यान, जेजुरी येथील शहीद शंकर शिंदे गॅस एजन्सीचे संचालक सागर शिंदे यांनी ७ मार्चपासून व्यावसायिक गॅस उपलब्ध झालेला नसल्याचे सांगितले. शासनाच्या सूचनेनुसार घरगुती ग्राहक, रुग्णालये व शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात तालुका पुरवठा अधिकारी गोपाळ ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, आखाती युद्धामुळे गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली असून शासनाच्या आदेशानुसार हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था आणि अत्यावश्यक सेवांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल असोसिएशनच्या समस्या वरिष्ठांपर्यंत मांडल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जेजुरीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याची शंकादेखील काही व्यावसायिकांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला विजय झगडे, आप्पा बयास, पंकज राहटेकर, अक्षय दरेकर, गणेश गाढवे, अभिजित कुदळे, धनंजय गोडसे, मल्लू कोळी, योगेश भापकर, अविनाश हरपळे, शब्बीर तांबोळी यांच्यासह शंभराहून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

Web Title : जेजुरी होटल संकट: गैस की कमी से बंद होने का खतरा; 130 होटल जोखिम में

Web Summary : जेजुरी में एलपीजी की भारी कमी के कारण होटलों पर बंदी का खतरा मंडरा रहा है, जिससे तीर्थयात्री प्रभावित हैं। पर्यटकों की संख्या बढ़ने के बावजूद, गैस की कमी से संचालन बाधित हो रहा है। एसोसिएशन ने व्यापक बंद और नौकरी के नुकसान से बचने के लिए सरकारी हस्तक्षेप की मांग की है, जिससे पर्यटन को खतरा है।

Web Title : Jejuri Hotel Crisis: Gas Shortage Threatens Closures; 130 Hotels at Risk

Web Summary : Jejuri's hotels face closure due to a severe LPG shortage, impacting pilgrims. Despite increased footfall, gas scarcity hinders operations. The association seeks government intervention to avert widespread shutdowns and job losses, threatening tourism.