Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 22:09 IST2024-09-22T22:08:29+5:302024-09-22T22:09:36+5:30
Pune Rain Update: रविवारचा दिवस असल्याने बाहेर फिरायला आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
पुणे - पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुणेकर उकाड्याला सामोरे जात आहेत. उकाड्याने त्रस्त असताना रविवारी रात्री नऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
आज सकाळपासूनच ऑक्टोबर हिटप्रमाणे उष्णता जाणवू लागली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. अचानक रात्री नऊच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुण्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू लागला आहे. कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, बोपोडी भागात ढगफुटीसदृश्य पावसाला सुरुवात झाली आहे.
ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासहीत मुसळधार पाऊस पुण्यात पडत आहे. रस्त्याला नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र दिसू लागले आहे. रविवारचा दिवस असल्याने बाहेर फिरायला आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. कात्रज, सिंहगड रोड भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. येरवडा भागातही विजांचा कडकडाटबरोबर मुसळधार पाऊस पडू लागला आहे.