एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 00:00 IST2025-11-18T23:59:42+5:302025-11-19T00:00:06+5:30
कवलीमळा येथे यापूर्वीही बिबट्यांचा वावर वारंवार दिसत असून गेल्या काही दिवसांपासून कवलीमळ्यात एकही कुत्रा शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद
लोकमत न्यूज नेटवर्क
अवसरी - अवसरी खुर्द-कवलीमळा (ता.आंबेगाव) येथे पुन्हा एकदा बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रवींद्र वाळके यांच्या नवीन घराच्या पोर्चमध्ये तसेच जुन्या घरासमोर मंगळवार दि.१८ रोजी पहाटे तीनच्या सुमारास तब्बल तीन बिबटे बसल्याचे दिसून आले.साधारण दोन ते तीन मिनिटे परिसरात थांबून हे बिबटे पुन्हा मागे गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले.
कवलीमळा येथे यापूर्वीही बिबट्यांचा वावर वारंवार दिसत असून गेल्या काही दिवसांपासून कवलीमळ्यात एकही कुत्रा शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भरत वसंत भोर यांच्या वासरावर काही दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती अधिक वाढली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, “एकाच वेळी तीन बिबटे फिरताना दिसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुलांना, जनावरांना बाहेर सोडण्यास भीती वाटते.” वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. वनविभागाने या भागात गस्त वाढवावी आणि योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त झाली आहे.