Amit Shaha: गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 18:41 IST2021-12-15T18:36:41+5:302021-12-15T18:41:04+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा

Amit Shaha: गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत
पुणे: देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) येत्या रविवारी (१९ डिसेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री शहा थेट पुणे महापालिकेत येणार असून त्यांच्या शुभहस्ते हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या हिरवळीवर महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहेत.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, 'दोन्ही कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थित राहणार असून गृहमंत्री शाह हे स्वतः महापालिकेत येत असल्याचा विशेष आनंद आहे.'
'हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी आपणा सर्वांनाच दिशा दिलेली आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांच्या वाटेवरून वाटचाल करणे, हे प्रेरणादायी आहे. म्हणूनच महापालिका म्हणून पुणेकरांसाठी काम करत असताना या दोन्ही महापुरुषांचे पुतळे असावीत, ही मनोमन इच्छा होती. जी आता पूर्णत्वास जात असताना मनस्वी समाधान आहे.'