संभाजी पोलिस चौकीमागे पुन्हा होर्डिंग उभारणी;महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 17:15 IST2025-03-02T17:12:51+5:302025-03-02T17:15:29+5:30

- होर्डिंग उभारणाऱ्यास राजकीय वरदहस्त असल्याने प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे.

Hoardings erected again behind Sambhaji Pune Road police post; There is talk that the administration is ignoring it because the person erecting the hoarding has political clout | संभाजी पोलिस चौकीमागे पुन्हा होर्डिंग उभारणी;महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले

संभाजी पोलिस चौकीमागे पुन्हा होर्डिंग उभारणी;महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले

- हिरा सरवदे

पुणे : महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी पाडून टाकलेले टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या मागील होर्डिंग पुन्हा उभारण्याचे काम सुरू आहे. या होर्डिंगच्या परवानगीसंदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यास संबंधितांनी पोलिसांच्या समोर हुसकावून लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, होर्डिंग उभारणाऱ्यास राजकीय वरदहस्त असल्याने प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे.

संभाजी पोलिस चौकीच्या मागे वर्षभरापूर्वी तीन होर्डिंग एकत्र करून एकच मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. हा प्रकार माध्यमांनी उजेडात आणल्यानंतर तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी या होर्डिंगवर जाहीरात प्रसिद्ध करण्यास बंदी घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणात कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले होते.

दुसरीकडे होर्डिंग वाचवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने जागावाटप नियमावलीला मूठमाती देत ही जागा संबंधित होर्डिंग व्यावसायिकाला ११ महिने मुदतीने भाड्याने देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, माध्यमांनी पाठपुरावा करत प्रकरण लावून धरल्याने प्रशासनाकडून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

होर्डिंगवर कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन होर्डिंगमालकाने कारवाईस स्थगिती मिळवण्यासाठी महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये महापालिकेने हे होर्डिंग पाडून टाकले होते. यानंतर आता पुन्हा याच ठिकाणी होर्डिंग उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. होर्डिंग उभारण्यासाठी नदीपात्रात साहित्य आणून ठेवले असून, वेल्डिंग व कटिंगचे काम सुरू आहे.



दरम्यान, शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी गेले असता, संबंधित होर्डिंग मालकाने काम थांबविण्याचे लेखी आदेश घेऊन यायचे आणि न्यायालयात दे. अभ्यास करून इथे यायचे, असे म्हणत तेथून हुसकावून लावले. दरम्यान, होर्डिंग मालकावर राजकीय वरदहस्त असल्याने तो पोलिसांच्यासमोर महापालिकेच्या अधिकाऱ्यास अरेरावी करण्याचे धाडस करत असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

‘याठिकाणी होर्डिंग उभारण्याबाबत न्यायालयाने परवानगी दिली असल्याबाबत महापालिकेला कोणतीही माहिती नाही.’’ - ॲड. निशा चव्हाण, मुख्य विधि अधिकारी, महापालिका 

‘‘होर्डिंगला परवानगी माझ्याकडून दिली जाते, मी अशा प्रकारे कोणत्याही होर्डिंगला परवानगी दिलेली नाही. काम थांबविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याने तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.’’ - पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
 

Web Title: Hoardings erected again behind Sambhaji Pune Road police post; There is talk that the administration is ignoring it because the person erecting the hoarding has political clout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.