पुण्यातील या पुलावर साकारण्यात आलाय अभियांत्रिकीचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:33 IST2018-03-12T19:33:21+5:302018-03-12T19:33:21+5:30
पुण्यातील सीअाेईपी चाैकातील उड्डाणपुलाच्या खांबावर अभियांत्रिकीचा इतिहास उलगडण्यात आला असून ही चित्रे येथून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत अाहेत.

पुण्यातील या पुलावर साकारण्यात आलाय अभियांत्रिकीचा इतिहास
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्ते व पदपथांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. यात नागरिकांच्या आवडीनिवडींचा विचार करुन जास्तीत जास्त आकर्षक करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या अंतर्गतच पालिकेने अभियांत्रिकी महाविद्यालय(सीओईपी)चौकातील उड्डाणपूल सुशोभित केला असून त्यावर अभियांत्रिकीचा इतिहास उलगडणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. ही चित्रे सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सीओईपी चौकातील उड्डाणपुल नव्यानेच बांधण्यात आला आहे. एकावर एक अशी रचना असलेला पुण्यातील हा एकमेव पूल आहे. या पुलाचे खांब हे लांबीला मोठे आहेत आणि उंचही आहेत. या जागेचा स्मार्ट वापर करत या खांबांवर भारतातील पहिले इंजिनिअर ज्यांनी सीओईपीमध्ये शिक्षण घेतले हाेते अश्या सर विश्वेश्वरैया यांचे चित्र काढण्यात आले आहे. त्याचबरोबर सीओईपी तसेच पुणे महापालिकेचा लोगोचे चित्रही येथे पाहायला मिळते. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पावरुन प्रेरणा घेत या खांबांवर विविध फुलांची रोपेही लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अश्या पद्धतीने सुशोभित केलेला हा शहरातील पहिलाच पुल आहे.

नेहमी धुळीने माखलेले किंवा पान मसाला, गुटखा खाऊन थुंकलेले खांब सगळीकडे पाहायला मिळतात. मात्र पुणे महापालिकेच्या या अनोख्या उपक्रमामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्याचबरोबर या चौकात आल्यानंतर आपण नक्की भारतातच आहोत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
