इतिहासकार सांगतात की, शनिवारवाडा येथील मजार बनावट, त्याबद्दल अभिमान वाटतो - मेधा कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:58 IST2025-10-27T14:58:03+5:302025-10-27T14:58:30+5:30
व्यक्ती पूजा न करता लेखन करू, तेव्हाच ते इतिहास लेखन खरे असेल, त्यामुळे बुद्धिभेद करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तरे दिली जातील, अशी पुस्तके खूप लिहिले पाहिजेत

इतिहासकार सांगतात की, शनिवारवाडा येथील मजार बनावट, त्याबद्दल अभिमान वाटतो - मेधा कुलकर्णी
पुणे : लेखक अनेक लिपी, अनेक भाषांतील साहित्य वाचून इतिहास लेखन करीत असतो. त्यातून इतरांना प्रेरणा मिळत असते. त्यामुळे हे देशकार्य समजून राजकारण्यांनी लिहित्या हातांना प्रोत्साहन दिले पाहिजे. बुद्धिभेद करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तरे दिली जातील, अशी पुस्तके खूप लिहिले पाहिजेत. व्यक्ती पूजा न करता लेखन करू, तेव्हाच ते इतिहास लेखन खरे असेल, असे मत खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी शनिवारवाडा येथील संशयास्पद मजार खोटी असल्याचे सांगत स्पष्ट भूमिका घेतली, त्याबद्दल अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.
पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या कन्या इचलकरंजी येथील राणी अनुबाई यांच्या चरित्र पुस्तक प्रकाशनप्रसंगी त्या बाेलत हाेत्या. या वेळी मंचावर ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, डॉ. उदय कुलकर्णी, लेखिका मोहिनी करकरे उपस्थित होते. तत्पर्वी डॉ. उदय कुलकर्णी यांनी पुस्तकावर बाेलताना जिजाबाई, अहिल्याबाई ते लक्ष्मीबाई या सक्षम महिलांच्या यादीत अनुबाई येतात. पेशवा कुटुंबातील त्या सर्वात वरिष्ठ महिला होत्या, असे सांगितले.
कुलकर्णी म्हणाल्या, अनुबाईसाहेब यांची कर्तबगारी व तत्कालीन मराठा राजकारणातील घडामोडी या पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांना जाणून घेता येणार आहे. अनेक बाह्य आणि आतील संकटांवर मात करत अनुबाईसाहेब यांनी मोठ्या हिमतीने राज्यकारभार चालवला. बाळाजी विश्वनाथ ते माधवराव पेशवे अशा सर्व पेशव्यांच्या कार्यकाळात त्या कार्यरत होत्या. रणांगणावरील पराक्रम व राजकिय मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी अनेक राजकीय व कौटुंबिक पेचांना कर्तबगारीने सोडविले. मोहिनी पेशवे - करकरे यांनी गेली पाच वर्ष सर्व प्रकाशित व अप्रकाशित साहित्याच्या आधारे अनुबाईसाहेब यांच्या चरित्राचा अभ्यास करत हे अत्यंत सुंदर असे पुस्तक लिहिले आहे. मराठेशाहीतील या कर्तबगार महिला राज्यकर्तीचा इतिहास आपण सर्वांनी नक्कीच जाणून घ्यायला हवा.
बलकवडे म्हणाले की, अठराव्या शतकातील कर्तृत्ववान स्त्री म्हणजे अनुबाई घोरपडे. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची कन्या आणि व्यंकटराव जोशी उर्फ घोरपडे यांची पत्नी हाेत. पेशवाईचा चालता-बोलता इतिहास हाेत्या. अनेक वावटळांना त्यांनी तोंड दिले. शाहू महाराज अनुबाई यांना मानस कन्या मानत. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वात वसईचा लढा सुरू असताना व्यंकटरावांनी गोव्याची नाकेबंदी केली. अनुबाई यांनीही संस्थान टिकवण्यासाठी जीवाचे रान केले हाेते. पेशव्यांच्या सूना १७८४ सालापर्यंत पत्र व्यवहार करून अनुबाई यांच्याशी सल्ला मसलत करत. त्यांचे मार्गदर्शन घेत. हा सर्व पट लेखिका माेहिणी करकरे यांनी पुस्तकात मांडला असून, संशोधकांसाठी हे पुस्तक मोलाचे दस्त ऐवज ठरेल.