त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय; ब्रेनडेड ४९ वर्षीय व्यक्तीमुळे ५ रुग्णांना नवजीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:44 IST2025-03-18T13:43:42+5:302025-03-18T13:44:16+5:30
उपचार घेताना ब्रेनडेड झालेल्या ४९ वर्षीय पुरुषाचे हृदय, मूत्रपिंड आणि नेत्र दान करून पाच रुग्णांना नवजीवन देण्यात आले

त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय; ब्रेनडेड ४९ वर्षीय व्यक्तीमुळे ५ रुग्णांना नवजीवन
पुणे : रस्ते अपघातानंतर एका खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेताना ब्रेनडेड झालेल्या ४९ वर्षीय पुरुषाचे हृदय, मूत्रपिंड आणि नेत्र दान करून पाच रुग्णांना नवजीवन देण्यात आले. यातील हृदय मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले, एक मूत्रपिंड बाणेर येथील रुग्णालयात, तर दुसरे नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल महिला रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. नेत्र पुण्यातील एका पेढीकडे पाठविण्यात आले.
रस्ता ओलांडताना ४९ वर्षीय पुरुष अभियंत्याचा अपघात झाला. ही घटना गुरुवारी (दि. १३) रात्री घडली. डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने शुक्रवारी रात्री ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने अवयवदानास संमती दिली. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी त्यांचे हृदय, मूत्रपिंड आणि नेत्र काढण्यात आले आणि ग्रीन कॉरिडॉरद्वारे विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले.
एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण नोबल हॉस्पिटल येथे मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर करण्यात आले. या टीममध्ये डॉ. विक्रम सातव, डॉ. संगीता चंद्रशेखर, वैद्यकीय प्रशासक डॉ. राज कोद्रे, अभिजित देशमुख, प्रवीण जाधव, प्रत्यारोपण समन्वयक विशाल तोरडे, डॉ. शशिकांत आसबे, डॉ. नीलेश वसमतकर इत्यादींचा समावेश होता.
विविध रुग्णालयांमध्ये अवयव पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केल्याबद्दल आम्ही वाहतूक पोलिसांचे व हडपसर पोलिस स्टेशनच्या टीमचे आभार व्यक्त करतो. तसेच या सर्व प्रक्रियेचे समन्वय केल्याबद्दल झेडटीसीसी (झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी) पुणे यांचेही आभार मानतो. - डॉ. दिलीप माने