पुणे: दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्या व्यक्तीला शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेता येत नाही; शिवाय निवडणूक लढविण्याचा अधिकारसुद्धा नसल्याचा कायदा करण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या अपत्याची माहिती न देता निवडणूक लढवून सरपंच बनलेल्या व्यक्तीबाबतचे पुरावे उघड झाल्यानंतरही गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर ना कारवाई होत आहे ना चौकशी अहवालावर निकाल दिला जात आहे.
ही घटना आहे मुळशी तालुक्यातील साठेसाई या गावातील. मुळशी तालुक्यातील साठेसाई ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी पोटच्या पोराला जगापासून लपविण्याचा प्रयत्न झाला केला. ही बाब गटविकास अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालात उघड झाली आहे. याबाबतचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे पाठविण्यात आला असून, तेथून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही गेला. मात्र, त्याच्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी एस. पी. भागवत यांनी दिली.
सुमन ऊर्फ दीपाली प्रवीण साठे (सरपंच, साठेसाई ग्रामपंचायत) असे ठपका ठेवण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, साठेसाई ग्रामपंचायतीची निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये झाली होती. त्यामध्ये सुमन ऊर्फ दीपाली प्रवीण साठे यांनी मोनिका सहादू खिलारे यांचा सुमारे शंभर मतांनी पराभव केला. त्यानंतर सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीतही त्या निवडून आल्या. त्यानंतर मोनिका खिलारे आणि सुमित्रा यादव यांनी सुमन ऊर्फ दीपाली यांना २००१ नंतर तीन अपत्ये असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली दीपाली साठे यांच्या अपत्यांचे पुरावे जमा करण्यास सुरुवात केली. चार वर्षांनंतर सुमन ऊर्फ दीपाली यांच्या तीन मुलांच्या जन्मदाखल्यांचा पुरावा माहिती अधिकाराखाली रुग्णालयांनी सादर केला. त्यानुसार २३ जानेवारी रोजी मोनिका खिलारे यांनी पहिली तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात केली.
तक्रारीनुसार या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मुळशी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानुसार त्यांनी दोन्ही पक्षांचे जबाब घेतले; मात्र, प्रत्येक जबाबावेळी सुमन ऊर्फ दीपाली साठे या गैरहजर राहिल्या. त्यांनी वेळोवेळी पुढची तारीख मागून घेतली. मात्र, वारंवार त्या सुनावणीवेळी साठे अनुपस्थितीत होत्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन व कुटुंबीयांची चौकशी करून विस्तार अधिकारी यांनी त्यांचा अहवाल गटविकास अधिकारी यांना दिला. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनीही याबाबत सुनावणी घेऊन व पुरावे तपासून दीपाली साठे यांना २००१ नंतर तीन अपत्ये असल्याचे दिसून येत असल्याचा तब्बल ११६ पानांचा अहवाल दिला.
भिवंडी दवाखान्यात मिळाले जन्मदाखले
सुमन ऊर्फ दीपाली साठे यांना हर्ष, साई आणि अनुष्का अशी अपत्ये असून, या तिघांचा जन्मदाखला पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे. या तिन्ही अपत्यांचा जन्म भिवंडी निजामपूर येथील दवाखान्यात झाला असून, यातील अनुष्काचा जन्म २००७ साली, साईचा जन्म २००८ साली तर हर्षचा जन्म २०१० साली झाला आहे. त्याचे जन्म प्रमाणपत्रही या अहवालात जोडण्यात आले आहे.