इथे चालकही वापरेना हेल्मेट; आता मात्र दाेघांनाही सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:33 IST2024-12-05T11:28:56+5:302024-12-05T11:33:16+5:30
वाहतूक नियमांचे पालन अधिक प्रभावी करण्यासाठी आता पाठीमागे बसणाऱ्यांसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे.

इथे चालकही वापरेना हेल्मेट; आता मात्र दाेघांनाही सक्ती
पुणे : पुण्यात हेल्मेट सक्तीचे पालन करावे, यासाठी हेल्मेट न घालणाऱ्या चालकांवर, तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तींवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे पालन अधिक प्रभावी करण्यासाठी आता पाठीमागे बसणाऱ्यांसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मात्र, दुचाकी चालक स्वत: हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी या नियमाची अंमलबजावणी किती आणि कशी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारआहे.
आता पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती
वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा नवा नियम लागू केला आहे. वाहन अपघातांमध्ये पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या दुखापतीचे प्रमाण वाढत आहे. या निर्णयामुळे अपघातात मृत्यू आणि गंभीर जखमांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवरून प्रवास करताना दोन्ही जणांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा नियम कोणताही नवीन नाही. शहरात होणारे अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, नागरिकांनी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. आम्ही सीसीटीव्ही आणि वाहन पकडल्यानंतर हेल्मेट नसेल तर दंडात्मक कारवाई करतच असतो. दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनी देखील आता हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई होऊ शकते. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त