प्लॅस्टिक मुक्तीसाठी शाळांची घेणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:46 PM2019-12-12T13:46:47+5:302019-12-12T13:48:10+5:30

प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना जोडून घेणार

Helping schools to get rescue from plastic | प्लॅस्टिक मुक्तीसाठी शाळांची घेणार मदत

प्लॅस्टिक मुक्तीसाठी शाळांची घेणार मदत

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापकांना प्रशिक्षण देणार

पुणे : शासनाने प्लॅस्टिक वापरावर बंदी घातल्यानंतर पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. यासोबतच शहरातील प्लॅस्टिक गोळा करून ते पुन:प्रक्रिये करिता पाठविले जाते. पालिकेसोबत ‘सागरमित्र’ नावाची संस्था यासंदर्भात काम करीत आहे. प्लॅस्टिक मुक्तीच्या या कामासाठी आता शहरातील पालिका आणि खासगी अशा एकूण ८०० शाळांची मदत घेतली जाणार आहे. सुरुवातीला मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना या कामामध्ये जोडून घेतले जाणार आहे.
प्लॅस्टिकबंदीनंतर प्लॅस्टिक गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. सागरमित्र ही संस्था गोळा केलेले प्लॅस्टिक पुन:प्रक्रिया करून वापरात आणते. आता शहरातील खासगी आणि पालिकेच्या शाळांमधून प्लॅस्टिक गोळा करण्याची नवी कल्पना मांडण्यात आली आहे. या शाळांना सहभागी करून घेण्यासाठी सुरुवातीला मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरामधील प्लॅस्टिक गोळा करून आणायचे. हे प्लॅस्टिक शाळांमध्ये जमा करायचे. दर शनिवारी हे प्लॅस्टिक पालिका शाळांमधून गोळा करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मुलांनाही प्रदूषणमुक्तीसाठी राबविल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती मिळणार असून, त्यांना प्लॅस्टिकचा वापर न करण्याची सवय लागेल. शहरातील ८०० शाळांमधून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक गोळा होऊ शकणार आहे.
......
पालिकेच्या आणि खासगी शाळांची बैठक
सुरुवातीला पालिकेच्या ५० आणि ५० खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
हे मुख्याध्यापक त्यांच्या शाळांमधील प्रत्येकी दोन शिक्षकांना या उपक्रमात सहभागी करुन घेणार आहेत. त्यांनाही प्रशिक्षित करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने १ हजार ६०० शिक्षकांना या उपक्रमात सहभागी करून उद्दिष्ट असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
....
‘सागरमित्र’ संस्थेची संकल्पना
सागरमित्र या संस्थेने ही संकल्पना मांडली होती. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांनी संस्थेसोबत हा प्रयोग कोल्हापूरच्या शाळांमध्ये यशस्वीरित्या राबविला. त्यानंतर सोलापूर आणि अन्य महापालिकांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर पुणे महापालिकाही हा उपक्रम राबविणार असल्याचे मोळक यांनी सांगितले. 

Web Title: Helping schools to get rescue from plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.