पुणे: दहा ते बारा दिवसाच्या उघडीपनंतर शहर व परिसरात सकाळी मुसळधार पाऊस तर दुपारी ऊन असा ऊन-पावसाचा लपंडाव पुणेकरांनी अनुभवला. ढगाळ वातावरणामुळे दुपारनंतर काहीसा उकाडा जाणवत होता. शहरात सकाळी पावणे दहा वाजेपर्यंत ६.९ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील काही दिवस शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यंदाचा मे महिना उन्हाळ्यापेक्षाही पावसाळी हंगामाचा अधिक ठरला. त्यातच मोसमी वाऱ्यांचे दहा ते पंधरा दिवस लवकर आगमन झाले. त्यामुळे मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मे च्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर तब्बल दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे पुण्यात धुवाधार आगमन झाले. त्यानंतर परत जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप घेतल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी ( दि. १५) पहाटेपासून पुण्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. सकाळी ११ पर्यंत येरवडा, वाघोली, लोणीकंद, सिहंगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, प्रभात रस्त्यासह मध्यवर्ती पेठेमध्ये मुसळधार पाऊस झाला. दुपारी पावसाने काहीशी उघडीप घेतली. मात्र, ढगाळ वातावरणामुळे काहीसा उकाडा जाणवत होता. शहरातील काही भागात सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली.
पावसामुळे पुण्यातील वाहतूक ठप्प
मुसळधार पावसामुळे पुण्यातील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड निराशा झाली. सततच्या पावसामुळे दैनंदिन कामे विस्कळीत झाली, अनेक भागात वाहतूक कोंडी आणि संथ गतीने हालचाली सुरू झाल्या होत्या. पुणे वाहतूक पोलिस परिस्थिती हाताळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.