...त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा! चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणं शिवसेना महिला आघाडीला भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:41 IST2025-11-01T12:40:42+5:302025-11-01T12:41:40+5:30
रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या महिलांनी आंदोलन केले होते

...त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा! चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणं शिवसेना महिला आघाडीला भोवलं
पुणे: एक महिला असूनही आत्महत्याग्रस्त महिलेबाबत असंवेदनशील आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने आंदोलन केले होते. यावेळी आंदोलक महिलांनी “चाकणकर महिला आयोग अध्यक्षा आहेत, की महिलांचा अपमान करणाऱ्या प्रवक्त्या? असा सवाल उपस्थित केला होता.
आता या महिला आघाडीला रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण भोवलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांच्यासह १० ते १२ महिला पदाधिकाऱ्यांविरोधात नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
चाकणकर यांच्या गारमाळ (धायरी) येथे संपर्क कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात ज्योती चांदरे, अमृत पठारे, रेखा कोंडे, स्वाती कथलकर, जयश्री भणगे, विद्या होडे, निकिता मारटकर, सरोज कार्वेकर, सुनीता खंडाळकर, छाया भोसले यांच्यासह महिला पदाधिकारी, युवती सेना व शिवसैनिक सहभागी झाले होते. या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान महिला आयोग हे महिलांच्या सन्मानासाठी असतो, महिलांचा अपमान करण्यासाठी नव्हे. रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका सिद्ध केली आहे. त्या महिलांच्या हक्कांची नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या मुखपत्र आहेत! त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. महिलांचा अवमान करणाऱ्यांना महिला समाज माफ करणार नाही आणि शिवसेना शांत बसणार नसल्याचे रेखा कोंडे यांनी आंदोलनात सांगितले होते.