ते नाराज होणाऱ्यांतील नाहीत, संघर्ष करणारे नेते आहेत; शिरसाठ यांच्याकडून शिंदेंच्या अनुपस्थितीचे समर्थन
By राजू इनामदार | Updated: January 29, 2025 20:27 IST2025-01-29T20:27:34+5:302025-01-29T20:27:44+5:30
आमच्या पक्षाकडे इन कमिंग वाढत आहे, याचा अर्थच उबाठा मधील आऊट गोईंग सुरू झाल्याचे शिरसाठ यांनी यावेळी सांगितले

ते नाराज होणाऱ्यांतील नाहीत, संघर्ष करणारे नेते आहेत; शिरसाठ यांच्याकडून शिंदेंच्या अनुपस्थितीचे समर्थन
पुणे: गावी गेले तरी नाराज, घरीच राहिले तरी नाराज, कुठे गेले नाहीत तरी नाराज. एकनाथ शिंदे हे असे करणाऱ्या नेत्यांमधील नाहीत. ते लढणारे आहेत. संघर्ष करणारे आहेत. घरगुती अडचणींमुळे ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला नव्हते अशा शब्दांमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी मंत्रीमंडळातील शिंदे यांच्या अनुपस्थितीचे समर्थन केले.
समाजकल्याण विभागाच्या आढावा बैठकीसाठी म्हणून शिरसाठ पुण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी या विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून विविध योजनांचा आढावा घेतला. पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. मुळात ते लढणारे नेते आहेत, नाराज वगैरे होणाऱ्यांमधील नाहीत. आमच्या पक्षाकडे इन कमिंग वाढत आहे, याचा अर्थच उबाठामधील आऊट गोईंग सुरू आहे. गणेश नाईक यांनी ठाण्यात भारतीय जनता पक्षाचा काही कार्यक्रम घेतला असेल तर तो आमच्या विरोधात आहे असे म्हणता येणार नाही. त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांचा अधिकार आहे.
दोन पालकमंत्रीपदांना स्थगिती दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली आहे. लवकरच याचा निर्णय जाहीर करण्यात येईल. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत खैरे यांना विधानसभा निवडणुकीआधी मीच आमच्याकडे येण्याची ऑफर दिली होती, मात्र ते आले नाहीत, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. आता ५ वर्षे कसलीही ऑफर नाही असे शिरसाठ म्हणाले