Cyber Crime: अँप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून तरुणाचा मोबाइल केला हँक; मागितली 14 लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:33 IST2022-07-15T16:33:28+5:302022-07-15T16:33:38+5:30
मोबाइलमधील संपर्क क्रमाकांना तरुणाविरूद्धचे बदनामीकारक आणि अश्लील संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकीही दिली

Cyber Crime: अँप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून तरुणाचा मोबाइल केला हँक; मागितली 14 लाखांची खंडणी
पुणे : गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगत अनोळखी व्यक्तींनी तरुणाचा मोबाइल हँक केला. त्याच्या मोबाइलमधील संपर्क क्रमाकांना तरुणाविरूद्धचे बदनामीकारक आणि अश्लील संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून 13 लाख 87 हजार 765 रूपयांची खंडणी मागून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आंबेगाव येथे राहाणा-या एका 30 वर्षीय तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. दि. 1 सप्टेंबर 2011 ते 2 जून 2022 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तरुणाला गुगल प्ले स्टोअरवरून ’कँश अँडव्हान्स’ आणि ‘स्मॉल लोन’ ही अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगत त्याच्या मोबाइलमधील सर्व संपर्क क्रमांक व माहिती चोरली. फिर्यादीच्या बँक खात्यात मागणी केलेली नसतानाही पैसे पाठवून पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली खंडणी मागण्यात आली. तसेच फिर्यादीच्या मोबाइलमधील संपर्क क्रमाकांना फिर्यादीविषयी बदनामीकारक आणि अश्लील संदेश पाठवत जीवे मारण्याची धमकी देत 13 लाख 87 हजार 765 रूपयांची खंडणी मागून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चिंतामण करीत आहेत.