एचसीएमटीआर मारक नव्हे तर ठार मारकच : आरोपांवर अधिकारीही निशब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 12:09 PM2019-12-02T12:09:03+5:302019-12-02T12:09:39+5:30

पुणे शहर हे केवळ पालिका प्रशासन व राज्यकर्त्यांचेच नाही तर ते सर्वसामान्यांचेही आहे.

HCMTR project was not good : Officials silenced the allegations | एचसीएमटीआर मारक नव्हे तर ठार मारकच : आरोपांवर अधिकारीही निशब्द

एचसीएमटीआर मारक नव्हे तर ठार मारकच : आरोपांवर अधिकारीही निशब्द

Next
ठळक मुद्दे‘एचसीएमटीआर पुणेकरांसाठी मारक की तारक ’ या चर्चासत्र

पुणे : एचसीएमटीआर (उच्च क्षमता उन्नत वाहतुक मार्ग) प्रकल्प पुणे शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी फायदेशीर आहे, असा दावा रविवारी पालिका प्रशासन व सत्ताधारी प्रतिनिधींकडून केला गेला़. पण प्रतिवाद्यांकडून आलेले प्रश्न व खुलाशांची उत्तरे देण्यास त्यांना सपशेल अपयश आले़ .पुणे शहर हे केवळ पालिका प्रशासन व राज्यकर्त्यांचेच नाही तर ते सर्वसामान्यांचेही आहे. याची जाणीव त्यांना करून दिल्यावर, आम्ही तुमच्या भावना वरिष्ठांकडे नक्की पोहचू हे बोलून वेळ मारून नेण्याची वेळ त्यांच्यावर आली़. 
सजग नागरिक मंचच्यावतीने आयोजित, ‘एचसीएमटीआर पुणेकरांसाठी मारक की तारक ’ या चर्चासत्रात उपस्थित नागरिकांनी पालिकेचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे व सत्ताधारी भाजपचे प्रतिनिधी गोपाल चिंतल यांची बोलती बंद केली़.  प्रारंभी या दोघांनी हा प्रकल्प शहरासाठी किती महत्वाचा आहे, त्यासाठी किती कमी खर्च होईल, त्यात काळानुरूप कसे बदल केले. आदी गोष्टी सचित्र सांगितल्या़. मात्र, या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सारंग यादवाडकर, प्रशांत ईनामदार, अ‍ॅड. रितेश कुलकर्णी यांच्यासह उपस्थित नागरिकांनी आपली बाजू मांडली व यात हा प्रकल्प तारक की मारक नव्हे तर ठार मारक असल्याचे पुराव्यानिशी सादरीकरण केले़. यानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गोजारे यांनी, या प्रकल्पावर हरकती सूचना मागविण्याचे काम सुरू झाले असून तो अद्याप अंतिम झालेला नाही, असे सांगितले़. तर प्रकल्पाची निर्मिती, निविदा काढणे यावर मी काय उत्तर देणार मी एक अभियंता आहे़. मी पॉलिसी मेकर नाही, शहर सुधारणा समिती, स्थायी समिती, मुख्य सभा याबाबत निर्णय घेते असे सांगून त्यांनी यावेळी हात झटकले़. सार्वजनिक वाहतुक सुधारणा हा एचसीएमटीआर प्रकल्पाचा मुख्य गाभा आहे. 
.........
पालिका सभेच्या पटलावर हे विषय मांडू : चिंतल
एचसीएमटीआरवर चर्चासत्रात एकूण १२७ मुद्दे उपस्थित केले गेले व त्याची नोंद मी घेतलेली आहे़, असे सांगून सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या गोपाल चिंतल यांनी, या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेणे जरूरी असून, मी हे सर्व मुद्दे महापालिकेच्या मुख्य सभेसमोर नक्की मांडेन व मी पुन्हा येईन असे सांगितले़. 

मनपात तज्ज्ञ खूप, पण सुज्ञांची वानवा : यादवाडकर 
पुणे महापालिकेत तज्ज्ञ खूप आहेत पण सुज्ञांची वानवा आहे़ अशी टीका करीत सारंग यादवाडकर यांनी, पुणे हे केवळ पालिका प्रशासन व राज्यकर्त्यांचे नाही तर ते सर्वसामान्यांचे आहे याची जाणीव ठेवण्याची गरज आहे़. राज्यकर्तेही स्वत:ची आर्थिक गणिते जुळली की प्रशासनाच्या पाठीशी राहतात, असा आरोप करीत, या प्रकल्पाला कडाडून विरोध केला़. 
 

शंभरचे शून्य होण्यास वेळ लागणार नाही...
महापालिकेत आज भाजपचे शंभर नगरसेवक आहेत पण हा प्रकल्प राबविला तर या शंभरमधील एकही जण निवडून येण्याची शक्यता नाही़ हे मी तुमच्याच पक्षाचा एक सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता सांगत आहे़, अशा शब्दांत उपस्थित भाजप कार्यकर्ता म्हणवणाऱ्या गणेश आवटे यांनी चिंतल यांची बोलती बंद केली़. तुम्हाला शहरातील वाहतूककोंडी खरोखरच सोडवायची असेल तर प्रथम तुमचे नगरसेवक, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी केलेली अतिक्रमणे काढा असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला़.
.........
मी पॉलिसी मेकर नाही : गोजारे
एचसीएमटीआरची बाजू मांडणारे पथ विभागाचे दिनकर गोजारे यांना या वेळी उपस्थित समस्यांचे व तांत्रिक मुद्द्यांचे समाधान करण्यास या वेळी सपशेल अपयश आले़. प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी मोघम उत्तरे देऊन विषय वेगळीकडे वळविला़.  उपस्थित नागरिकांनी मुद्द्याचे बोला अशी मागणी केली असता, मी पॉलिसी मेकर नाही, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली़. एचसीएमटीआर प्रकल्पावर सध्या हरकती व सूचना मागविण्याचे काम सुरू आहे, तो अंतिम झालेला नाही़ मी केवळ एक कार्यकारी अभियंता आहे, तुमच्या सर्व प्रश्नांवर मी काय उत्तर देणाऱ प्रकल्प अंमलबजावणीचा निर्णय पालिकेतील शहर सुधारणा समिती, स्थायी समिती व मुख्य सभा घेत असते़.  यानंतरच पालिका प्रशासन त्यावर काम करते, असे सांगून त्यांनी यावेळी एचसीएमटीआरचा चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात टोलवला़. 

Web Title: HCMTR project was not good : Officials silenced the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.