महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना; त्यानंतर न्यायालयाचा अवमान, सुरज शुक्ला ७ दिवस गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:02 IST2025-07-08T11:01:57+5:302025-07-08T11:02:30+5:30
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या शुक्लाला १००० रुपये दंडासह सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली

महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना; त्यानंतर न्यायालयाचा अवमान, सुरज शुक्ला ७ दिवस गजाआड
पुणे : कोर्टाने काही बांगड्या घातल्या आहेत का? आम्ही घातल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाचा अवमान करणाऱ्या सूरज आनंद शुक्ला (वय ३५, रा. विश्रांतवाडी) यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांच्या न्यायालयाने १००० रुपये दंडासह सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांकडून शुक्ला यास अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने हे विधान करत न्यायालयाचा अवमान केला व सर्व साक्षीदारांचे जबाब तत्काळ नोंदविले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे वकील पी. एम. मिश्रा यांनी समक्ष गुन्ह्याची कबुली दिली व चूक झाली माफी करावी. आरोपीला कमीत कमी शिक्षा व दंड ठोठावण्यात यावा, अशी विनंती केली, तसेच आरोपी वेडसर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तपास अधिकारी यांना विचारले असता त्यांनी आरोपीस पहाटे ३.५५ मिनिटांनी अटक केली. तेव्हापासून न्यायालयात हजर करेपर्यंत आरोपी वेडसर असल्याचे दिसून आलेले नसल्याचे सांगितले. तसेच आरोपीच्या वकिलांनी तो वेडसर असल्याचे कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला १००० रुपये दंडासह सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नीलिमा इथापे- यादव यांनी कामकाज पाहिले.